
Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक; काय आहे प्रकरण?
नवी दिल्लीः दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ही कारवाई केली आहे.
दिल्लीमध्ये उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच काही दारु उत्पादकांसाठी नियमावली 'लीक' करुन देण्यात आली, असा आरोप सिसोदिया यांच्यावर आहे. या प्रकरणी दारु उत्पादकांकडून शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा दावा ईडीने केला आहे.
आज सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी ट्विट केलं की, "आज मी पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचं प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावं लागलं तरी चालेल. पण, तुम्ही काळजी करू नका. मी भगतसिंग यांचा अनुयायी आहे. अशा खोट्या आरोपांमुळं तुरुंगात जाणं ही छोटी गोष्ट आहे. "
यादरम्यान सिसोदिया यांचं मनोबल वाढवण्यासाठी हजारो कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर पोहोचले होते. सिसोदिया यांच्या घराबाहेर प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अखेर चौकशीनंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे.