प्रदूषणाच्या मुद्याचे राजकारण करू नका: अनिल दवे

वृत्तसंस्था
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

इस्रोने दिलेल्या छायाचित्रांवरून दिल्लीतील प्रदूषणामध्ये इतर राज्यांतील प्रदूषणाचा केवळ 20 टक्के सहभाग असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच दिल्ली सरकारला प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्‍यक ती मदत देऊ केली असून त्याची अंमलबजावणी करणे हे दिल्ली सरकारचे कर्तव्य आहे.

- अनिल दवे

केंद्रीय पर्यावरण मंत्री

 

नवी दिल्ली - इतरांना दोष देऊन दिल्लीच्या प्रदूषणाच्या मुद्याचे राजकारण करण्यापेक्षा हा प्रश्‍न लवकरात लवकर सोडवावा असे म्हणत केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना दवे म्हणाले, 'इस्रोने दिलेल्या छायाचित्रांवरून दिल्लीतील प्रदूषणामध्ये इतर राज्यांतील प्रदूषणाचा केवळ 20 टक्के सहभाग असल्याचे दिसत आहे.' तसेच "केंद्र सरकारने यापूर्वीच दिल्ली सरकारला प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्‍यक ती मदत देऊ केली असून त्याची अंमलबजावणी करणे हे दिल्ली सरकारचे कर्तव्य आहे', असेही ते पुढे म्हणाले. राजधानी दिल्लीत प्रदूषणामुळे दिवसेंदिवस धुके वाढत असून लोकांना श्‍वास घेण्यासही त्रास होत आहे. धुक्‍यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. दिल्लीतील वातावरण हे बालके, महिला, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना धोकादायक असल्याचे म्हणत केंद्राने प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीत आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीतील प्रदूषणाला पंजाब आणि हरियाना जबाबदार असल्याचा आरोप करत या दोन राज्यांमुळेच दिल्लीत गेल्या 17 वर्षांतील वाईट हवा निर्माण झाल्याचेही म्हटले आहे.

Web Title: Delhi government should stop politicising pollution issue : Dave