न्यायालयाने ३४४ औषधांवरील बंदी उठवली

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

बंदी घालण्यात आलेले बहुतांश औषधे अशी होती की, जी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय लोकांना औषध दुकानातून घेता येत होती. त्याचबरोबर या औषधांच्या बेसुमार जाहिरातीमुळे नागरिकांमध्ये ती लोकप्रिय झाली होती. 

नवी दिल्ली - सरकारने घेतलेला निर्णय योग्य नसल्याचे मत नोंदवत दिल्ली उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) ३४४ औषधांवर सरकारने घातलेली बंदी उठवली. यामध्ये सर्दी, डोकेदुखी दूर होण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विक्स अॅक्शन ५०० आणि कोरेक्स कफ सिरफ, डीकोल्डचाही समावेश आहे. 

अशाप्रकारची औषध बनविणाऱ्या कंपन्यासमवेत आरोग्य क्षेत्रातून दाखल झालेल्या ४५४ याचिकांवर निकाल देताना न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने फायजर, ग्लेनमार्क, प्रॉक्टर अँड गॅम्बलर, सिप्ला आणि काही स्वंयसेवी संस्थांच्या याचिकांवर हा निकाल दिला आहे. 

फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनचा रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होत असल्याचे सरकारने म्हटले होते. त्यानंतर १० मार्च रोजी या औषधांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु,  न्यायालयाने १४ मार्च रोजी या बंदीला स्थगिती दिली. आता ४४ औषधांवर बंदी घालताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण न्यायालयाने म्हटले आहे.

आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता दोन किंवा अधिक औषधे एकत्र केल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला होता. या औषधांमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सरकारने म्हटले होते.
 

Web Title: Delhi HC quashes ban on 344 fixed dose combination medicines