
Delhi Murder Case : हत्या करून फ्रिजमध्ये लपवला गर्लफ्रेंडचा मृतदेह अन् केलं...
काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील श्रद्धा वालकर हत्याकांडाने देश हादरला होता. अशाच स्वरूपाच आणखी एक हत्याकांड समोर आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दिल्लीमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, तरुणीची हत्या करून काही वेळात त्या नराधमाने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं.
दिल्लीमधील बाबा हरिदास नगर परिसरातील ही घटना आहे. 22 वर्षीय निक्की यादवची तिच्या लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडने हत्या केली, त्यानंतर तिचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवून ठेवला आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्याने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केले. साहिल गहलोत आणि निक्की यादव लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी साहिलला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साहिलने निक्की यादवची मोबाईल केबलने गळा दाबून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला आणि दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केलं. ही घटना 10 फेब्रुवारीला घडली. साहिल दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार हे निक्कीला समजल्यानंतर तिने साहिलला जाब विचारला आणि यावरूनच दोघांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद वाढत गेल्यामुळे साहिलने रागाच्या भरात मोबाईल केबलने गळा दाबून निक्कीची हत्या केली. साहिल आणि निक्की यादवची भांडण गाडीमध्ये झाली. साहिलने गाडीतच निक्कीची हत्या केली.
निक्कीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह गाडीतच घेऊन तो बराच वेळ फिरला. त्यानंतर बाबा हरिदास नगर परिसरामध्ये त्याचा ढाबा आहे त्या ढाब्यावर जाऊन निक्कीचा मृतदेह त्याने फ्रिजमध्ये लपवून ठेवला. निक्कीला साहिलशी लग्न करायचं होतं, परंतु साहिलचे कुटुंबीय या दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे त्याने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करायचं ठरवलं.