दिल्लीची मेट्रो सोमवारपासून धावणार; महाराष्ट्रात कधी?

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 2 September 2020

मेट्रो वाहतूक सुरू करण्याबाबतची नियमावली यावेळी जाहीर करण्यात आली.

नवी दिल्ली- कोरोनाच्या ‘अनलॉक-४’ मध्ये येत्या सोमवारपासून (ता.७) दिल्लीची जीवनवाहिनी ठरलेली दिल्ली मेट्रो व अन्य १२ शहरांतील मेट्रो सेवा येत्या ७ सप्टेंबरपासून (सोमवार) टप्याटप्याने व सशर्त सुरू करण्यास केंद्र सरकारने बुधवारी परवानगी दिली. महाराष्ट्रात कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता मुंबई-नागपूर मेट्रो व मोने रेल्वेसेवा ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत.

केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी, नगरविकास सचिव दुर्गाशंकर मिश्रा व दिल्ली मेट्रोचे महासंचालक मंगूसिंह यांनी आज सायंकाळी ही माहिती दिली. मेट्रो वाहतूक सुरू करण्याबाबतची नियमावली यावेळी जाहीर करण्यात आली. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे गेले पाच महिने देशभरातील मेट्रो व मोनो रेल्वे वाहतूक बंद आहे. दिल्लीतील बहुतांश व्यवहार सुरू झाले तरी दररोज तब्बल ४० लाखांहून जास्त लोकांची ने-आण करणारी मेट्रो केंद्र सरकार सुरू करत नसल्याने दिल्लीकरांमध्ये मोठी नाराजी होती.

Good News : आता ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर मिळणार कर्ज 

दिल्ली सरकारने याबाबत केंद्राला पुन्हा विनंती केली होती. अखेर केंद्राने ती मान्य करीत ७ ते १२ सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्याने सर्व मार्गिकांवरील मेट्रो सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला. दिल्लीच्या प्रवाशांनी आरोग्यविषयक नियमांचे पालन केले नाही, स्थानकांवर गर्दी केली तर मात्र मेट्रो सुरू ठेवण्याचा फेरविचार करावा लागेल असा इशाराही केंद्र सरकारने दिला आहे.

अशी आहे नियमावली

- सुरुवातीला यलो लाइन व ९ सप्टेंबरपासून ब्लू लाइन सेवा सुरू.
- प्रतिबंधित क्षेत्रातील स्थानके बंद राहणार.
- निवडक प्रवेशद्वारेच उघडणार. प्रवेश-बाहेर पडणे यासाठी वेगवेगळे मार्ग.
- प्रथम सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ४ ते रात्री ८ याच वेळेत मेट्रो धावणार
- हा कालावधी टप्प्याटप्याने वाढवून १२ सप्टेंबरला आढावा घेऊन सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत मेट्रोसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेणार.
- टोकन मिळणार नाहीत. प्रत्येक प्रवाशास स्मार्ट कार्ड आवश्यक.
- मास्क, सॅनिटायजरचा वापर अत्यावश्यक.
- मास्क नसलेल्यांना स्थानकात प्रवेश नाकारणार.
- मेट्रो गाडीतही मोजक्या प्रवाशांनाच प्रवेश. एकाआड एक आसनावर प्रवासी बसवणार.
- दिल्ली, नोएडा, चेन्नई, कोची, बंगळूर, जयपूर, हैदराबाद, कोलकता मेट्रो, गुजरात मेट्रो व लखनौ मेट्रोने नियमावली तयार केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Metro to run from Monday When Maharashtra metro start