गडकरी तीन वर्षांत बांधणार दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा नवा द्रुतगती महामार्ग पुढील तीन वर्षांत पूर्ण होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. हरियानातील मेवत आणि गुजरातमधील दाहोड या देशातील सर्वांत मागास जिल्ह्यांमधून हा द्रुतगती महामार्ग जाणार आहे. 

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा नवा द्रुतगती महामार्ग पुढील तीन वर्षांत पूर्ण होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. हरियानातील मेवत आणि गुजरातमधील दाहोड या देशातील सर्वांत मागास जिल्ह्यांमधून हा द्रुतगती महामार्ग जाणार आहे. 

या नव्या द्रुतगती महामार्गामुळे दिल्ली-मुंबईचे अंतर 1,450 किलोमीटरवरून 1,250 किलोमीटर इतके होणार आहे. शिवाय, दिल्ली-मुंबई या रस्त्यावरील प्रवासासाठी लागणारा वेळही निम्म्याने कमी होणार आहे. सध्या दिल्ली-मुंबई हे अंतर कापण्यासाठी 24 तास लागतात. या द्रुतगती मार्गाचे काम येत्या डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याची माहिती गडकरी 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या एका कार्यक्रमात दिली. 

या मार्गासाठी अंदाजे एक लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय केंद्र सरकारने चंबळ द्रुतगती मार्ग तयार करण्याचाही निर्णय घेतला आहे. हा मार्ग दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे. यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानला त्याचा फायदा होईल. राजधानी दिल्लीवरील वाहतुकीचा भार कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एकूण 10 प्रकल्प हाती घेतले आहेत. याची एकत्रित किंमत 35,600 कोटी रुपये असेल, असे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील बडोदा ते सुरत या मार्गासाठी कामास सुरवात होणार आहे आणि सुरत ते मुंबई या मार्गासाठी निविदा लवकरच काढल्या जातील, असे गडकरी यांनी सांगितले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियानाच्या मागास भागांतून हा द्रुतगती मार्ग जाणार असल्यामुळे या भागातील विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

हा द्रुतगती मार्ग लवकर पूर्ण करण्यासाठी एकाच वेळी 40 ठिकाणी काम सुरू होणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. 'देशातील एकूण मालवाहतुकीपैकी जवळपास 15 टक्के वाहतूक दिल्ली-मुंबई या मार्गावर होत असते. ही मालवाहतूक वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या मार्गावर अधिक पायाभूत सुविधा निर्माण केल्यास त्याचा या सर्व भागातील गावांना-शहरांना फायदा होईल', असेही गडकरी म्हणाले.

Web Title: Delhi Mumbai expressway will be built within three years says Nitin Gadkari