पवार-मोदी भेट : कर्जमाफीसाठी मोदी अनुकूल नाहीत

अनंत बागाईतकर
मंगळवार, 6 जून 2017

ही परिस्थिती भीषण आहे
शेतकऱ्यांच्या आत्महत्यां संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे तपशीलवार माहिती मागितली होती. त्याला उत्तर देताना केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी 12 हजार शेतकरी आत्महत्या करत आहेत. ही परिस्थिती भीषण असल्याचेही पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले. 

नवी दिल्ली : "तो कर्जमाफीचा निर्णय उत्तर प्रदेश राज्यापुरताच मर्यादित होता. भाजपच्या तेथील प्रादेशिक संघटनेने तसा ठराव केला होता. त्याचा संबंध देशातील इतर राज्यांशी नाही," असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात कर्जमाफी देण्यास अनुकूलता दर्शवली नाही. 

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सध्या देशभरात गाजत असलेले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी पंतप्रधानांकडे मांडले. 

पवार यांनी पंतप्रधान मोदींना भेटून सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या असलेल्या परिस्थितीचे तपशील सांगितले. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी स्वाभाविक आहे, असे पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले. 

तुमचेच लोक आंदोलनात पुढे
दरम्यान, सध्या चाललेल्या शेतकरी संपाला व आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी एक मुद्दा म्हणून पाठिंबा दिलेला आहेच. परंतु, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सत्तारुढ घटकपक्षच या आंदोलनात अधिक सक्रिय आहेत, असे सांगून पवार यांनी त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यावे असे सांगितले. 

Web Title: delhi news farmers strike narendra modi disapproves loan waiver