लष्करप्रमुखांचे वागणे रस्त्यावरील गुंडाप्रमाणे

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

लोकशाही संस्थांचा कायम अनादर करणाऱ्या कॉंग्रेसने आता लष्कराला लक्ष्य करणे धक्कादायक आहे. दीक्षित यांच्या माफीमध्ये प्रामाणिकपणाचा अभाव आहे. त्यामुळे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच माफी मागितली पाहिजे.
- निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री

कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांचे वादग्रस्त विधान; नंतर माफी

नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांची विधाने रस्त्यावरील गुंडाप्रमाणे असून, भारतीय लष्कराच्या संस्कृतीला न शोभणारी आहेत, असे विधान करत कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी वाद निर्माण केला. काल (ता. 11) केलेल्या त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर आणि कॉंग्रेसवर जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी आज माफी मागितली.

दीक्षित यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे शब्द वापरले होते. जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती आणि लष्कराची भूमिका याबाबत वृत्तवाहिनीशी बोलताना संदीप दीक्षित यांचा तोल गेला होता. "गुंडांसारखी विधाने करण्यास आपण पाकिस्तानी लष्करासारखे माफिया लष्कर नाही. मात्र, आपले लष्करप्रमुख "सडक का गुंडा' असल्यासारखे वक्तव्ये करतात, त्यावेळी ते खराब दिसते,' असे दीक्षित म्हणाले होते. "भारतीय लष्कराला एक सन्माननीय दर्जा आहे. या लष्कराचीही एक संस्कृती आहे. मात्र, या संस्कृतीमध्ये शोभून दिसतील असे सध्याचे लष्करप्रमुख वागत नाहीत. लष्करप्रमुखांनी राजकीय विधाने करू नयेत,' असेही दीक्षित म्हणाले होते. संदीप दीक्षित हे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत.

त्यांच्या या विधानावर भाजपने अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त करत दीक्षित यांचा निषेध केला होता. दीक्षित यांच्या विधानाबद्दल कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी आणि अशा नेत्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपने केली होती. सोशल मीडियामधूनही या विधानावर बरीच टीका झाली होती. सर्व बाजूंनी टीका झाल्याने संदीप दीक्षित यांनी आज ट्‌विटरच्या माध्यमातून माफी मागितली. "लष्करप्रमुखांवरील विधानामागे माझी विशिष्ट भूमिका आहे. मात्र, तरीही मी योग्य शब्दांचा वापर करायला हवा होता. मी माफी मागतो,' असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांच्या या माफीवर भाजप समाधानी नाही. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही, "कोणत्याही राजकीय नेत्याने लष्करप्रमुखांबद्दल आदरानेच बोलावे,' असे सांगत दीक्षित यांची कानउघाडणी केली आहे.

Web Title: delhi news general bipin rawat army and sandeep dixit