Nikki Murder Case : मोबाईलची कॉर्ड, फ्रिजमध्ये लपवलेलं प्रेत, खुनानंतर लगेच लग्न; खुनाचा थरारक घटनाक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sahil Gehlot Nikki Yadav
Nikki Murder Case : मोबाईलची कॉर्ड, फ्रिजमध्ये लपवलेलं प्रेत, खुनानंतर लगेच लग्न; खुनाचा थरारक घटनाक्रम

Nikki Murder Case : मोबाईलची कॉर्ड, फ्रिजमध्ये लपवलेलं प्रेत, खुनानंतर लगेच लग्न; खुनाचा थरारक घटनाक्रम

दिल्लीमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे साहिल गेहलोत आणि निक्की या दोघांची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेच्या चार दिवस आधीच साहिलने आपली प्रेयसी निक्की यादवची गळा दाबून हत्या केली. आता या सगळ्या खुनाचा घटनाक्रम समोर आला आहे.

आरोपी साहिलने आपली प्रेयसी निक्कीची हत्या केल्यानंतर लगेचच घरच्यांच्या मर्जीने दुसरं लग्नही केलं. आता साहिलला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना एका बंद पडलेल्या ढाब्यामधून निक्कीचं प्रेत सापडलं आहे. २०१८ पासून रिलेशनशीपमध्ये असलेल्या निक्की- साहिलमध्ये बिनसलं कुठे? जाणून घ्या....

कशी झाली ओळख?

जानेवारी २०१८मध्ये साहिल दिल्लीतल्या उत्तमनगरमध्ये SSC परीक्षेची तयारी करायला आला होता. तर निक्कीही डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन मेडिकलच्या तयारीसाठी दिल्लीत आली होती. दोघेही एकाच बसने आपल्या कोचिंग क्लासला जात होते. दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

एका महिन्यांनंतर साहिलने ग्रेटर नोएडाच्या एका कॉलेजमध्ये डी. फार्मसीला प्रवेश घेतला तर निक्कीने त्याच कॉलेजमध्ये बीए इंग्लिशसाठी प्रवेश घेतला. त्यानंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. दोघे मनाली, ऋषिकेश, हरिद्वार, अशा विविध ठिकाणी फिरायलाही गेले.

आणि साहिलचं लग्न ठरलं!

कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये दोघेही आपापल्या घरी निघून गेले. तिथून परतल्यावर ते पुन्हा एकत्र राहू लागले. आरोपी साहिलने आपल्या नात्याबद्दल आपल्या घरी सांगितलं नव्हतं. अशात आता त्याच्या घरचे त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकू लागले. साहिलनेही होकार दिला आणि डिसेंबर २०२२ मध्ये साहिलचं लग्न ठरलं. साखरपुडा ९ फेब्रुवारीला आणि लग्न १० फेब्रुवारीला करायचं हे ठरलं.

निक्कीचा गोव्याला जायचा प्लॅन होता...

साहिलच्या लग्नाबद्दल निक्कीला काहीच माहित नव्हतं. तिला जेव्हा कळलं तेव्हा तिला धक्काच बसला. त्यानंतर निक्की आणि साहिलमध्ये मोठं भांडण झालं. दोघांनी लग्नाआधीच गोव्याला पळून जायचं नियोजनही केलं. निक्कीने तर ९ फेब्रुवारीची तिकिटंही काढली होती. दोघांनी एकत्र आत्महत्या करण्याचा प्लॅनही केला होता. पण साहिलने ऐनवेळी गोव्याला जाण्यास नकार दिला.

पोलिसांच्या माहितीनुसार, निक्कीने साहिलवर केस करण्याची धमकी दिली, तरी साहिलने ९ तारखेला ठरल्याप्रमाणे साखरपुडा केला. त्यानंतर निक्कीने त्याला आपल्या घरी भेटायला बोलावलं. साहिलने निक्कीला कारमध्ये बसवलं आणि दोघांच्यात भांडणं झाली. निक्की सातत्याने साहिलला लग्न करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होती. पण साहिलने नकार दिला. या भांडणादरम्यानच साहिलने निक्कीला मारण्याचं ठरवलं.

मोबाईलच्या डेटा केबलने आवळला गळा

साहिलने मोबाईलच्या डेटा केबलने निक्कीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर साहिल तिचं प्रेत घेऊन एका ढाब्यावर गेला. ढाबा अनेक दिवसांपासून बंद होता. तेव्हा त्याने निक्कीचं प्रेत याच बंद ढाब्यातल्या फ्रिजमध्ये ठेवण्याचं ठरवलं. प्रेत फ्रिजमध्ये ठेवून लगेच त्याच रात्री त्याने लग्न करायचं ठरवलं आणि १० तारखेला लग्नही केलं.

टॅग्स :crime