
Rahul Gandhi : राहुल गांधींनी दिल्ली पोलिसांना सांगितलं, 'भारत जोडो यात्रा लंबी होती, घरी आल्यावर...
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काश्मीरमधील भारत जोडो यात्रेदरम्यान केलेल्या वक्तव्यावर दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची विचारपूस केली. तब्बल दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांना राहुल गांधींची भेट घेता आली.
विशेष आयुक्त सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितलं की, राहुल यांची भेट झाली. आम्हाला जी माहिती हवी होती, ती माहिती ते आमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यांना पुन्हा एकदा नोटीस देण्यात आली असून नोटीस त्यांच्या कार्यालयाने घेतली आहे.
16 मार्च रोजी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना नोटीस दिली होती, मात्र राहुल यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. यानंतर दिल्ली पोलीस आज त्यांच्या घरी पोहोचले. दरम्यान, पोलिसांनी राहुल गांधी यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान भारत जोडोचा प्रवास प्रवास लांबचा होता. मला काहीच आठवत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलीस राहुल गांधी यांचे जबाब नोंदवणार आहेत. मात्र, त्यासाठी अद्याप वेळ निश्चित करण्यात आलेली नाही.
राहुल गांधी काश्मीरमध्ये म्हणाले होते काही महिलांनी त्यांच्याकडे लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या आहेत. आजही महिलांसोबत लैंगिक छळ होत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना त्या पीडित महिलांची माहिती राहुल गांधींकडून जाणून घ्यायची आहे, जेणेकरून कायदेशीर कारवाई करता येईल.