पोलिसांनी 10 तास कडक पहारा दिला पण मेलेल्या उंदराला

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मे 2019

दुर्गंध येत असलेल्या बंद खोलीबाहेर जवळपास 10 तास पोलिसांनी कडक बंदेबस्त ठेवला. शिवाय, स्थानिक फॉरेन्सिक टीमलाही तपासासाठी घटनास्थळी बोलावले होते.

नवी दिल्ली: राजधानीमध्ये एका बंद खोलीमधून दुर्गंधी येत असल्याने खबरदारी म्हणून शेजारी राहणाऱयांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांना संशय आल्यामुळे बंद असलेल्या घराबाहेर दहा तास पहारा देण्यात आला. परंतु, घर उघडल्यानंतर आतमध्ये मेलेला उंदिर निघाला. डोंगर पोखरून उंदीर निघाला ही म्हणीचा प्रत्येय दिल्ली पोलिसांना आला.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील गोविंदपूरी परिसरातून शनिवारी (ता. 25) रात्री साडे बारा वाजता पोलिसांना एक दुरध्वनी आला. यावेळी एका बंद असलेल्या खोलीतून काही दिवसांपासून दुर्गंध येत असून, भाडेकरू गायब असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घर मालकाचा नंबर घेऊन त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचाही फोन स्विच ऑफ लागत होता. याप्रकरणी शेजाऱ्यांकडे चौकशी केली त्यावेळी घरमालक आणि भाडेकरू काही दिवसांपासून गायब असल्याची समजले. तपासादरम्यान संशय वाढत गेला. मालकाची सकाळपर्यंत वाट पाहायची त्यानंतर दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेण्यात आला. दुर्गंध येत असलेल्या बंद खोलीबाहेर जवळपास 10 तास पोलिसांनी कडक बंदेबस्त ठेवला. शिवाय, स्थानिक फॉरेन्सिक टीमलाही तपासासाठी घटनास्थळी बोलावले होते. दुसऱया दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अखेर घरमालकाशी संपर्क झाला. त्यावेळी त्याने काही दिवसांपूर्वी भाडेकरू घर सोडून गेला असल्याचे सांगितले. पोलिसांनी घरमालकाला चावी घेऊन बोलावले. कुलूप उघडून पोलिसांनी खोलीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांना समोर मेलेला एक उंदीर सापडला. काही दिवसांपासून उंदीर घरामध्ये मरून पडल्यामुळे दुर्गंधी पसरली होती.

दरम्यान, पोलिसांनी जवळपास 10 तास मेलेल्या उंदीर असलेल्या घराबाहेर पहारा दिला. पोलिसांनी घरमालकाला घराची स्वच्छता करण्याची सूचना देत निघून गेले. पण, या संबंधित बातमी पसरल्यामुळे अनेकांना हसून आवरेनासे झाले.

Web Title: Delhi police suspect murder but 10 hours after found dead mouse