VIDEO - लाल किल्ल्यावर झेंडा फडकला; घोषणा देणाऱ्या तरुणाचं भाजप कनेक्शन?

टीम ई सकाळ
Tuesday, 26 January 2021

एक फोटो व्हायरल झाला असून त्यात संबंधित तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुरुदासपुरचे भाजप खासदार सनी देओल यांच्यासोबत दिसत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनात ट्रॅक्टर परेडवेळी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धडक मारली. यावेळी लाल किल्ल्यावर काही शेतकऱ्यांनी संघटनांचे झेंडे फडकावले. प्रजासत्ताक दिनी भारतीय तिरंगा किल्ल्यावर मागे फडकत असताना अशा प्रकारे दुसरा झेंडा फडकावल्यानं सोशल मीडियावर टीकाही होत आहे. दरम्यान, आता यात आणखी एका व्हिडिओमुळे दुसरीच चर्चा रंगली आहे.

शेतकऱ्यांच्या गर्दीत घोषणा देणारी व्यक्ती दीप सिंधु असल्याचं समोर आलं आहे. तसंच त्याचा आणखी एक फोटो व्हायरल झाला असून त्यात संबंधित तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुरुदासपुरचे भाजप खासदार सनी देओल यांच्यासोबत दिसत आहे. दीप सिंधु कोणत्या पक्षाचा किंवा संघटनेचा आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तो सनी देओल यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगण्यात येत असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यानं भाजपसाठी काम केल्याचंही म्हटलं जात आहे.

हे वाचा - Tractor Parade - पुष्पवृष्टीने स्वागत ते लाल किल्ल्यावर धडक; पाहा शेतकरी आंदोलनाचे फोटो

दीप सिंधुने एक फेसबुक लाइव्ह करून त्यात सांगितलं आहे की, आम्ही लाल किल्ल्यावर फक्त निशाण साहीब झेंडा फडकावला. आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे तेवढंच आम्ही केलं असंही दीप सिंधुने म्हटलं आहे. 

काँग्रेस नेते तहसीन पूनावाला यांनी ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दीप सिंधु लाल किल्ल्यासमोर उभा राहून घोषणा देताना दिसत आहे. तहसीन यांनी असा आरोप केला की सरकारनेच आंदोलकांना लाल किल्ल्याकडे वळवण्यासाठी त्याला यात सहभागी केलं आहे. लाल किल्ल्यावर जो गोंधळ झाला त्याला शेतकरी नव्हे तर सरकारने घुसवलेले लोक जबाबदार होते असंही त्यांनी म्हटलं.ॉ

हे वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा लुक चर्चेत; गुजरातची शाही पगडी आकर्षण

ट्रॅक्टर रॅलीवेळी झालेल्या हिंसक घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं होतं की, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची ओळख पटवण्यात आली आहे. राजकीय पक्ष आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्ही शांततेत मोर्चा काढत आहे आणि शेतकरी ठरल्यानुसारच आंदोलन शांतपणे करत आहेत असंही ते म्हणाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi tractor parade red fort flag hoisted dip sindhu bjp connection video viral