दिल्लीत महिला मांत्रिकास अटक 

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जुलै 2018

दिल्ली पोलिस या सामूहिक आत्महत्या प्रकरणाची मानसशास्त्रीय अंगानेही चौकशी करणार आहेत. यामध्ये भाटिया कुटुंबाशी संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाइकांचीही मते जाणून घेण्यात येतील. 

नवी दिल्ली : देश हादरवून टाकणाऱ्या येथील बुराडी भागातील भाटिया परिवारातील अकरा जणांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस वाढत असताना गुन्हे शाखेला आज याप्रकरणी मोठे यश आले. दोनच दिवसांपूर्वी या सामूहिक आत्महत्येचा सूत्रधार हा ललित भाटिया असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी आज एका मांत्रिक महिलेला अटक केली आहे. 

गीता मॉं असे या महिलेचे नाव असून, ती एका बिल्डरची बहीण आहे. मागील काही दिवसांपासून ललित हा या महिलेच्या संपर्कात होता, आत्महत्येपूर्वीही त्याने या महिलेशीच संपर्क साधल्याचे उघड झाले आहे. ही महिला भूतबाधा दूर करण्याचे काम करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली असून सध्या तिची कसून चौकशी केली जात आहे, भाटिया कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी गीता मॉंशी चर्चा केली होती का? याचाही पोलिस शोध घेत आहेत.

दिल्ली पोलिस या सामूहिक आत्महत्या प्रकरणाची मानसशास्त्रीय अंगानेही चौकशी करणार आहेत. यामध्ये भाटिया कुटुंबाशी संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाइकांचीही मते जाणून घेण्यात येतील. 

कॉल डिटेल्स हाती 

भाटिया कुटुंबाने आत्महत्येपूर्वी कोणाशी संपर्क साधला होता, याचाही पोलिस शोध घेत असून, कुटुंबातील सदस्यांचे कॉल डिटेल्स त्यांच्या हाती लागले आहेत. भाटिया कुटुंबाने ज्यांच्याशी संपर्क साधला होता त्या सर्वांनाच चौकशीसाठी बोलाविले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत पोलिसांनी शंभर जणांची चौकशी केली आहे.

Web Title: Delhi women mantrikas arrested