जलिकट्टूला परवानगी द्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नवी दिल्ली / चेन्नई : प्राण्यांच्या प्रशिक्षणावर घातलेल्या बंदीतून बैलाला वगळावे आणि यंदाच्या जलिकट्टूला परवानगी द्यावी, अशी मागणी अण्णा द्रमुकतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आली. अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून राज्यात जलिकट्टूशी (बैलांची शर्यत) अनेकांच्या भावना जडल्या असल्याने याला परवानगी द्यावी अशी मागणी केली.

नवी दिल्ली / चेन्नई : प्राण्यांच्या प्रशिक्षणावर घातलेल्या बंदीतून बैलाला वगळावे आणि यंदाच्या जलिकट्टूला परवानगी द्यावी, अशी मागणी अण्णा द्रमुकतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आली. अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून राज्यात जलिकट्टूशी (बैलांची शर्यत) अनेकांच्या भावना जडल्या असल्याने याला परवानगी द्यावी अशी मागणी केली.

लोकसभेचे उपसभापती एम. थंबीदुराई यांच्या अध्यक्षतेखालील 27 सदस्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान कार्यालयाला यासंबंधी अण्णा द्रमुकतर्फे निवेदन दिले आहे. केंद्र यामध्ये बदल करू शकत असतानाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणे हे चुकीचे असल्याचे सांगत या शिष्टमंडळाने जलिकट्टूला परवानगी देण्याची विनंती केली. या वेळी थंबीदुराई यांनी केंद्राकडून तमिळनाडूच्या लोकांची मागणी मान्य होईल असा विश्‍वास व्यक्त केला. तसेच, हा मुद्दा केवळ आमच्या राज्यापुरताच मर्यादित नसून महाराष्ट्राचाही असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. या खेळात वापरले जाणारे बैल हे आमच्या घरच्या सदस्याप्रमाणे असल्याने त्यांना इजा होईल असे कोणतेही कृत्य आम्ही करत नाही, असेही ते या वेळी म्हणाले. दरम्यान, या शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल महादेव दवे यांनाही सकाळी याबाबत निवेदन दिले आहे.

शशिकला यांनीदेखील याविषयी बोलताना यामध्ये प्राण्यांवर कोणताही अत्याचार होणार नसून, तमिळनाडूत बैलांची पूजा केली जात असल्याने त्यांची काळजी नक्कीच घेतली जाईल असेही सांगितले आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनीदेखील केंद्राकडे जलिकट्टूला परवानगी देण्याची विनंती केली होती.

जलिकट्टू होणारच : पनीरसेल्वम
चेन्नई : जलिकट्टू होण्यासाठी विविध स्तरांतून मागण्या कायम असल्याने अखेर तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी जलिकट्टू होणारच असे विधान केले आहे. तसेच, या प्रकरणात माघार घेणार नसल्याचेही म्हटले आहे.

या वेळी बोलताना पनीरसेल्वम यांनी द्रमुकच्या टीकेचाही चांगलाच समाचार घेतला. यूपीएच्या काळात द्रमुक प्रमुख घटक असताना प्राण्यांच्या प्रशिक्षणावर बंदी घालताना बैलाचाही यात समावेश केल्याने जलिकट्टूला अडकाठी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. आता आम्ही अम्मांच्या पावलांवर पाऊल ठेवून काम करत असून, मी आणि तमिळनाडू सरकार जलिकट्टू होणारच याची खात्री देतो असे आश्‍वासन देत, आम्ही तमिळनाडूच्या लोकांचा वारसा आणि रुढी- परंपरा जपू, असेही म्हटले आहे.

Web Title: demand to allow jallikattu