दिल्लीकरांची पसंतीही इको फ्रेंडली गणपतींना

सकाळ न्यूज नेटवर्क 
Tuesday, 27 August 2019

700 रूपयांपासून ते 60 हजार रूपयांपर्यंत गणेशमूर्तींची किंमत असून यंदा इको फ्रेन्डली मूर्तींना दिल्लीकरांची मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. राजधानीत आनंदवन सांस्कृतिक सोसायटीसह काही मंडळे स्वतंत्रपणे गणेशमूर्ती मागवितात. 

नवी दिल्ली : आठवडाभरावर आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी दिल्लीकर सज्ज झाले असून गणपतीबाप्पाचे स्वागत करण्यासाठी विविध भागांतील मंडळांची लगबग सुरू आहे. बाबा खडकसिंह मार्गावरील महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या "मऱ्हाटी' या दालनात गणेशमूर्ती आणि पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी वाढती गर्दी आहे. 700 रूपयांपासून ते 60 हजार रूपयांपर्यंत गणेशमूर्तींची किंमत असून यंदा इको फ्रेन्डली मूर्तींना दिल्लीकरांची मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. राजधानीत आनंदवन सांस्कृतिक सोसायटीसह काही मंडळे स्वतंत्रपणे गणेशमूर्ती मागवितात. 

दिल्लीत सुमारे 40 मराठी गणेशोत्सव मंडळे आहेत. गेल्या काही वर्षांपासून अमराठी मंडळांतर्फेही गमेशोत्सव धूमधडाक्‍यात साजरा होतो. आर के पूरम, पश्‍चिम विहार, सरोजिनीनगर, लक्ष्मीनगर आदी भागांत गणेशोत्सव साजरा करण्याचे वाढते प्रमाण आहे. यानिमित्त सार्वजनिक उत्सव समिती, चौगुले विद्यालय या संस्थांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचेही भरगच्च आयोजन केले जाते. यावषीर्या उत्सवासाठी त्रिभुवनदास जव्हेरी, नंदा एस्कोर्ट, सरीन कंपनी, करोलबागेतील श्रीगणेश मराठा मंडळ आदी गणेश मंडळांनी मोठया गणरायाच्या मूर्ती आधीच रिझर्व करून ठेवल्या आहेत. मात्र यंदा राज्यावर महापुराचे विघ्न आल्याने अनेक मराठी मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ऱ्हाटी एम्पोरियममध्ये लहान मोठया आकाराच्या एकूण 1400 गणेशमूर्ती आहेत. यात 1200 मुर्त्या इकोफ्रेंडली आहेत तर उर्वरित 200 गणेशमूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या आहेत. 6 इंच ते 7 फुटापर्यंतच्या गणरायाच्या मूर्तीही येथे उपलब्ध आहेत. 2 सप्टेंबरपर्यंत (सोमवार) सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand for eco friendly Ganpati idols in Delhi