ऊस उत्पादकांना जादा दर देण्याची मागणी 

ऊस उत्पादकांना जादा दर देण्याची मागणी 

नवी दिल्ली : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना चालू गळीत हंगामात केंद्र सरकारने रास्त दर (एफआरपी) द्यावा, अशी मागणी आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत करण्यात आली. मागील वर्षी साखरेला 2900 रुपयांचा भाव मिळाला होता व यंदा त्यापेक्षा जास्त दर मिळावा, अशी राज्याची अपेक्षा आहे. 

केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस कृषिमंत्री राधामोहनसिंह हेही उपस्थित होते. मात्र, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मांडलेल्या ऊस दराच्या मागणीवर स्पष्ट आश्‍वासन केंद्राकडून देण्यात आलेले नाही. या वर्षी इथेनॉलच्या उत्पादनात वाढ करण्यात यावी, असे आवाहन गडकरी यांनी केले. इथेनॉल उत्पादनामुळे राज्याबाहेरून होणारी कच्च्या तेलाची आयात थांबण्यात मदत होईल. शिवाय इथेनॉल प्रदूषणमुक्त पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत कमी दराने उपलब्ध होतो, त्यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉल तयार करण्यास अधिक प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही गडकरी यांनी दिल्या. या वर्षी इथेनॉलनिर्मितीस प्राधान्य दिल्यामुळे; तसेच शुगर ज्युस ते इथेनॉलला 59 रुपये प्रतियुनिट भाव मिळाला होता. इथेनॉलला साखरेच्या तुलनेत अधिक दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांवरील थकीत कर्जाची परतफेड होऊ शकते, असे गडकरी म्हणाले. 

देशमुख यांनी सांगितले, की राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी विविध संमस्यांना तोंड देत आहेत. त्यांना मागील वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील रास्त आणि किफायतशीर दर मिळावा, अशी राज्याची मागणी आहे. राज्यातील बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर बॅंकेचे कर्ज आहे. त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळणार नाही, अशा शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन व्हावे, राज्यात या वर्षी साखरेचे अतिरिक्त उत्पादन झालेले आहे. मागील वर्षी साखरेला 2900 रुपयांचा भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. या वर्षीही अधिक भाव मिळावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com