दिव्यांग व्यक्‍तींना आपत्ती व्यवस्थापनासाठीचे प्रशिक्षण देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

कोणत्याही स्थितीत दिव्यांगावर आलेल्या संकटात त्यांची रक्षा होणे हे मानवीयदृष्ट्या अत्यंत योग्य आणि बरोबर आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यासंदर्भात पुढाकार घ्यावा, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे. 

पणजी : घरात दिव्यांग व्यक्‍ती असेल तर त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठीचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी गोवा दिव्यांग हक्‍क संघटना (ड्रॅग) यांनी केली आहे. अशी मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह उत्तर तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि राज्याच्या मुख्य सचिवांनाही लिहले आहे. 

कोणत्याही स्थितीत दिव्यांगावर आलेल्या संकटात त्यांची रक्षा होणे हे मानवीयदृष्ट्या अत्यंत योग्य आणि बरोबर आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यासंदर्भात पुढाकार घ्यावा, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे. 

2011 सालच्या जनगणनेनुसार गोव्यात तेहतीस हजार दिव्यांगजन होते. हा आकडा केवळ दिव्यांग बांधव आणि भगिणींचा असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश नाही. सरकारने आमच्या समस्यांना प्राधान्याने घ्यावे. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमुळे जर दिव्यांगांना दुखापत झाली तर त्यांची काळजी घेण्यासाठी असणाऱ्या लोकांना त्वरीत काय करावे, हे लक्षात येत नसल्याने नुकसान होते. हे नुकसान टळण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे म्हणणे ड्रॅगचे अध्यक्ष ऍव्हिलिनो डिसा यांनी व्यक्‍त केले. 
दरम्यान ड्रॅगने राज्यपाल मृदुला सिन्हा आणि गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वरून साहनी यांना दिव्यांगांना 4 टक्‍के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. दिव्यांग हक्‍क कायदा 2016 नुसार हे 4 टक्‍के आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावे, अशा मागणीचे पत्र ड्रॅगतर्फे राज्यपालांना देण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demands for Disaster Management Training for Disabled Person