रांगांचा अठरावा दिवस

Demonetization Protest
Demonetization Protest

नवी दिल्ली : देशभरात पाचशे व हजारच्या नोटाबंदीनंतर एटीएम व बॅंकांसमोरील गर्दी काही केल्या कमी होताना दिसत नाही. नोटाबंदीच्या निर्णयाला अठरा दिवस होऊनही बॅंका व एटीएमसमोरील रांगा कमी होत नसल्याने सर्वसामान्यांच्या समस्या मात्र जैसे थे असल्याचे चित्र आहे.

देशभरातील बॅंकांना शनिवार आणि रविवारी सुटी असल्याने एटीएम केंद्रांवरील रांगांमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पहाटेपासूनच लोक नोटा घेण्यासाठी एटीएमच्या रांगेमध्ये उभे असलेले पाहायला मिळाले. मात्र मोठ्या प्रमाणात ग्राहकांना चलनपुरवठा करताना एटीएम केंद्रांवर नोटांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. राजधानीतील बहुतांश एटीएमवर पैसे नव्हते किंवा ते काम करत नव्हते, अशी स्थिती असल्याने सर्वसामान्यांची मात्र ससेहोलपट कायम होती. दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील एटीएम केंद्रांवर मात्र गर्दी कमी असल्याचे पाहायला मिळाले, मात्र काही अपवाद वगळता एटीएमसमोर "आउट ऑफ सर्व्हिस' किंवा "कॅश नॉट अव्हेलेबल'चेच फलक पाहायला मिळत होते.

शनिवारी नोटाबंदीच्या निर्णयाला 18 दिवस झाले; मात्र देशातील चलनतुटवड्याच्या परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा होत नसल्याचे एकूण चित्र आहे.

भारतातील बहुतांश उद्योगधंद्यावर नोटाबंदीच्या निर्णयाचा विपरीत परिणाम झाला आहे. या निर्णयाची व्यवस्थित अंमलबजावणी न झाल्यास निर्णय बूमरॅंग होऊ शकतो, असे मत देशातील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले होते. नोटाबंदीच्या निर्णयाचा हेतू चांगला असला तरी सर्वसामान्यांची मात्र होरपळ काहीकेल्या थांबत नाही. अनेकजण काळा पैसा नसल्याचे दाखविण्यासाठी रांगांमध्ये उभी असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया दिल्ली येथील स्थानिक नागरिकाने व्यक्त केली.

पाचशे व हजारच्या नोटाबंदीनंतर दोन हजारच्या व पाचशेच्या नवीन नोटा व्यवहारात आणण्यासाठी सरकारने आटोकाट प्रयत्न केले असले, तरी सर्वसामान्यांना मात्र यातून अद्यापही दिलासा मिळाला नसल्याचेच चित्र सध्यातरी आहे.

नोटबंदी म्हणजे "फेअर लव्हली स्कीम'
नोटाबंदीच्या निर्णयावर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय हा "फेअर अँड लव्हली स्कीम'सारखा असल्याचा टोला कॉंग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी मारला. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही सुरजेवाला यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com