टीव्हीवर झळकण्यासाठी विरोधकांचा गोंधळ- महाजन

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

विरोधकांना फक्त टीव्हीमध्ये झळकायचे असते. तुम्हाला टीव्हीवरच झळकायचे आहे तर मी लोकसभा टीव्हीवाल्यांना तसे सांगते. पण, मंत्र्यांची अशी अडवणूक करू नका.

नवी दिल्ली - नोटबंदीच्या मुद्द्यावरून आजही (सोमवार) लोकसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांकडून गोंधळ होत असताना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी विरोधक टीव्हीवर झळकण्यासाठी गोंधळ घालत असल्याचे वक्तव्य केल्याने गोंधळात आणखी भर पडली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही नोटबंदीच्या मुद्द्यावरून गदारोळ पहायला मिळाला. तृणमुल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या खासदारांनी या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत गदारोळ घातला. यामुळे लोकसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयावरून विरोधी पक्षांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. 

लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांची कोणतीही मागणी मान्य न करता म्हणाल्या की, विरोधकांना फक्त टीव्हीमध्ये झळकायचे असते. तुम्हाला टीव्हीवरच झळकायचे आहे तर मी लोकसभा टीव्हीवाल्यांना तसे सांगते. पण, मंत्र्यांची अशी अडवणूक करू नका.

महाजन यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना खर्गे म्हणाले, की आम्ही येथे टीव्हीवर झळकण्यासाठी येत नाही. सरकार आमचे कोणतेही म्हणणे ऐकून घेत नाही, त्यामुळे आम्ही चर्चेची मागणी करत आहोत. नोटबंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Demonetisation: Unified Opposition continues to disrupt Lok Sabha proceedings