विद्यार्थी आंदोलनांनी काश्‍मीर खोरे पेटले

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

संतप्त विद्यार्थ्यांनी पोलिसांवर हल्ला करत जोरदार दगडफेक केली. या आंदोलनांमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये 50 जण जखमी झाले आहेत

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यामधील पुलवामा येथील सरकारी महाविद्यालयामध्ये पोलिसांच्या असलेल्या "अतिरिक्त' संख्येविरोधात काश्‍मीर खोऱ्यामधील महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये करण्यात येत असलेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले आहे.

श्रीनगर येथील श्री प्रताप महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी आज मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. संतप्त विद्यार्थ्यांनी पोलिसांवर हल्ला करत जोरदार दगडफेक केली. या आंदोलनांमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये 50 जण जखमी झाले आहेत.

दक्षिण काश्‍मीरमधील शोपियां, बिजबेहरा आणि खनबल, मध्य काश्‍मीरमधील गंडेरबल आणि उत्तर काश्‍मीरमधील पट्टण व सोपोर भागांमधील महाविद्यालयांमध्येही पोलिसांविरोधात हिंसक आंदोलन झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर व "स्टन ग्रेनेड्‌'सचा वापर करण्यात आला. काश्‍मीर विद्यापीठामध्येही झालेल्या आंदोलनामध्ये "आझादी'च्या घोषणाही देण्यात आल्या.

खोऱ्यामधील या आंदोलनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आज सकाळपासून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Demonstrations, clashes in Valley colleges