शिवसेनेला आणखी एक धक्का; भाजपकडून जगनमोहन यांना बळ?

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

लोकसभेचं उपाध्यक्षपद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला देण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षाकडून सुरु

नवी दिल्ली- भाजपकडून शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेचं उपाध्यक्षपद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला देण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मोदी सरकारकडून जगनमोहन रेड्डी यांना याबाबत जगनमोहन ऑफर दिली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात ऐतिहासिक यश मिळालं आहे. भाजपने स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मंत्रिमंडळात फारसं काही हाती लागलं नाही. त्यानंतर आता शिवसेनेला उपाध्यक्षपदापासूनही दूर राहावं लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिरुपती दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी त्यांनी जगनमोहन रेड्डी यांना लोकसभा उपाध्यक्षपदाचा प्रस्ताव दिला आहे, असे सांगण्यात येत आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे, कारण लोकसभेचं उपाध्यक्षपद मिळावं, यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना प्रयत्न करत आहे. जर वायएसर काँग्रेस पक्षाला लोकसभा उपाध्यक्ष पद दिलं गेलं तर शिवसेना काय पाऊल उचलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Speaker of Lok Sabha Post Offered to Jaganmohans YSRCP