
Desh : राहुल गांधींना नवा पासपोर्ट; आज अमेरिकेला जाणार
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज नवीन पासपोर्ट मिळाला. स्थानिक न्यायालयाने नवीन सामान्य पासपोर्टसाठी कोणतीही हरकत नसल्याचे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यानंतर, गांधी यांच्या हातात नवीन पासपोर्ट पडला. त्यामुळे, त्यांचा उद्या (ता. २९) अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राहुल गांधी यांना पासपोर्ट दिला जाईल, असे आश्वासन पासपोर्ट कार्यालयाने आज सकाळी गांधी यांना दिले होते. त्यानंतर, दुपारी राहुल गांधी यांना नवीन पासपोर्ट मिळाला. राहुल गांधी उद्या (ता.२९) अमेरिकेतील सॅन फ्रान्सिकोला जात आहेत. तेथे ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्याचप्रमाणे, वॉशिंग्टनमध्येही ते लोकप्रतिनिधींशी चर्चा करतील. त्यानंतर पत्रकार परिषदही घेतील.
दौऱ्याच्या समारोपाला न्यूयॉर्कमध्येही ते सार्वजनिक संमेलनात सहभागी होतील. ते अमेरिकेतील एकूण तीन शहरांचा दौरा करतील. राहुल गांधी यांनी लोकसभा खासदार असतानाचा राजनैतिक पासपोर्ट खासदारकी रद्द झाल्याने जमा केला होता.
त्यानंतर, त्यांनी सामान्य पासपोर्टसाठी अर्ज केला होता. पंतप्रधानांविरुद्धच्या मानहानी खटल्यात राहुल गांधी यांना दोषी ठरवत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात आले होते.