विकास करा नाही, तर तेलंगणमध्ये जाऊद्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 18 September 2019

तेलंगण सरकारने तेथील गावांमध्ये अंमलबजावणी केलेल्या कल्याणकारी योजना आमच्याकडेही लागू कराव्यात किंवा आमची गावे तेलंगण राज्यात विलीन करावीत, अशी मागणी नांदेडमधील काही गावांमधील नागरिकांनी केली. या नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे.

हैदराबाद - तेलंगण सरकारने तेथील गावांमध्ये अंमलबजावणी केलेल्या कल्याणकारी योजना आमच्याकडेही लागू कराव्यात किंवा आमची गावे तेलंगण राज्यात विलीन करावीत, अशी मागणी नांदेडमधील काही गावांमधील नागरिकांनी केली. या नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे.

तेलंगण सीमेनजीकच्या नांदेडमधील नळगाव, भोकर, देगलूर, किनवट आणि हथगाव या विधानसभा मतदारसंघांमधील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी ही मागणी केली असून हा मुद्दा घेऊनच आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निश्‍चय त्यांनी व्यक्त केला आहे.

बाभळी गावाचे सरपंच बाबूराव गणपतराव कदम यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची आज भेट घेत त्यांना या मुद्यावर पाठिंबा देण्याची विनंती केली. राव यांनी परवानगी दिल्यास त्यांच्या तेलंगण राष्ट्र समिती या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.

"आमच्या आणि तेलंगणमधील गावांच्या स्थितीत फार फरक आहे. तेलंगणमधील आमच्या शेजारच्या गावांमधील लोक आनंदी असून, आम्हाला मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेलंगणमधील प्रत्येक शेतकऱ्याला प्रतिएकर दरवर्षी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. आमचे सरकार मात्र अशी कोणतीही योजना राबवित नाही.

तेलंगणमधील गरिबांना दर महिन्याला 2,016 रुपये मदत मिळते; तर महाराष्ट्रात फक्त 600 रुपये मिळतात. तेलंगणमधील शेतकऱ्यांना 24 तास अखंड वीजपुरवठा होतो, आम्हाला आश्‍वासन दिलेले आठ तासही वीज मिळत नाही. त्यामुळेच तेलंगणमध्ये लागू होणाऱ्या योजना येथेही लागू कराव्यात; अन्यथा आम्हाला तेलंगणमध्ये विलीन करावे,' अशी मागणी या गावांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development Telangana Nanded Village chandrasekhar rao