फडणवीस पुन्हा दिल्लीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra fadanvis in delhi to meet amit shah jp nadda delhi

फडणवीस पुन्हा दिल्लीत

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी पुन्हा दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर राज्यातील खोळंबलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली. फडणवीस आपल्या ताज्या दिल्लीवारी दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी गाठीभेटी करणार असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर शिवसेनेतील अंतर्गत वादाबाबतच्या कायदेशीर लढाईबाबत कायदेतज्ज्ञांशीही ते चर्चा करू शकतात. येत्या 8 आॅगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  तोपर्यंत फडणवीस- शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास भाजप केंद्रीय नेतृत्वाने स्पष्ट नकार कायम ठेवला आहे.

फडणवीस यांनी प्रस्तावित मंत्रिमंडळाची यादी शहा यांच्याकडून अंतिम करण्यासाठी दिल्ली गाठल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी झाल्याने आज दिल्लीत आले नाहीत. शिवसेना व शिंदे गटाच्या वर्चस्ववादाच्या लढाीबाबत येत्या 8 आॅगस्टला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत कायदेतज्ज्ञांबरोबर चर्चा करणे व खोळंबलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराची यादी दिल्लीकडून मंजुर करवून घेणे या दोन मुद्यांभोवती उपमुख्यमंत्र्यांची आजची दिल्ली भेट फिरणार हे स्पष्ट आहे. 30 जून रोजी शिंदे फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर महिनाभर मंत्रिमंडळाचा विस्तार खोळंबला आहे. राज्याचे हे मंत्रीमंडल 'हम दो हमारे दो' चे मंंत्रिमंडळ असल्याची टीका विरोधक संसदेतही करू लागल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृ्ृत्वदेखील, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार फार काळ लांबवता येणार नाही, या निष्र्षाप्रत आल्याची माहिती मिळते.

सूत्रांच्या मते भाजप नेतृत्वाच्या दृष्टीने फडणवीस-शिंदे सरकारबाबत कोणतीही गोष्ट `मिसफायर` होणार नाही याची खात्री करूनच दिल्लीतून मंत्रीमंडळ विस्ताराबाबत हिरवा कंदील दिला जाणार हे स्पष्ट झाल्याने आता किमान येत्या सोमवारवर विस्ताराचा मुहूर्त गेला आहे. मुख्यमंत्री झाल्यावर शिंदे यापूर्वी पाच वेळा दिल्लीत आले. यापूर्वीच्या त्यांच्या दिल्ली दौऱयांत त्यांनी गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आदींशी गाठीभेटी केल्या होत्या. त्यातील बहुतांश भेटींच्या वेळी फडणवीस यांना दिल्लीत बोलावणे भाजप नेतृत्वाने कटाक्षाने टाळले होते.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगातील कारवाईला स्थगिती देण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केल्यानंतरच्या काळात भाजपच्या अंतस्थ गोटात काहीशी अस्वस्थता आहे. या परिस्थितीत दिल्लीतील भाजप नेतृत्वाने शिंदे गटाबाबतचा प्लॅन बी देखील तयार ठेवला असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या यापूर्वीच्या दौऱयांत न्यायालयीन सुनावणीबाबत साॅलिसिटर जनरल तुषार मेहता तसेच वरिष्ठ कायदेतज्ज्ञ मुकुल रोहतगी यांच्याशीही आज पुन्हा चर्चेच्या फेऱया केल्या होत्या. फडणवीस यांच्या आजच्या दिल्ली भेटीत भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व व अमित शहा यांच्या संमतीने प्रस्तावित शिंदे मंत्रिमंडळाची यादी निश्चित होऊन पुढच्या काही दिवसांत रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार केला जाईल, ही शक्यता आहे.

Web Title: Devendra Fadanvis In Delhi To Meet Amit Shah Jp Nadda Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..