सीमाप्रश्‍नी कर्नाटकशी चर्चा करणार - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

मुंबई - सीमाप्रश्नी लवकरच उच्चाधिकार समितीची बैठक बोलविण्यात येणार असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांना दिली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. ३०) सकाळी युवा कार्यकर्त्यांना चर्चा करण्यासाठी बोलाविले आहे.

मुंबई - सीमाप्रश्नी लवकरच उच्चाधिकार समितीची बैठक बोलविण्यात येणार असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांना दिली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. ३०) सकाळी युवा कार्यकर्त्यांना चर्चा करण्यासाठी बोलाविले आहे.

आझाद मैदान येथे युवा समितीतर्फे आयोजित लाक्षणिक उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस नेत्यांनी भेट देऊन महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. संध्याकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या उपस्थितीत युवा समिती पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

सकाळी ११ वाजता उपोषणाला सुरुवात झाली. दुपारी २ च्या सुमारास जयंत पाटील यांच्यासह अजित पवार, आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर यांनी आंदोलनस्थळी येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. 

जयंत पाटील यांनी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सातत्याने सीमावासियांना पाठबळ दिले आहे. आज विधीमंडळाचे कामकाज सुरू होताच स्थगन प्रस्ताव मांडून सीमाप्रश्नी चर्चा करण्याची मागणी आम्ही केली आहे. अशी माहिती देत युवा समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात येऊन मुखमंत्री फडणवीस यांची भेट घ्यावी, असे आवाहन केले. अजित पवार यांनी, युवा समितीने मांडलेल्या मागण्या लावून धरत सीमाप्रश्नी सरकारने तातडीने पावले उचलावीत, यासाठी सरकारला जागे करू, असे आश्वासन दिले. आमदार हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी, सीमाप्रश्नी सुरू असलेले आंदोलन जवळून पाहिले आहे. अनेक आंदोलनात सहभागी झालो आहे, यापुढेही सीमाप्रश्नी बेळगावला येऊन आंदोलन करायला आवडेल तसेच प्रश्नासाठी कारागृहात जाण्याचीही तयार आहे, असे सांगितले. शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी, १९८६ च्या आंदोलनात विभाग प्रमुख म्हणून सहभागी झालो होतो. त्यावेळी १ महिन्याची शिक्षा झाली होती. सीमाप्रश्नाची संपूर्ण जाण असून यापुढेही उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषिकांच्या समस्या आणि प्रश्न लवकर सुटावा, यासाठी कार्यरत असणार आहोत, असे सांगितले.
प्रारंभी हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकाला तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, यतेश हेब्बाळकर, महेश जाधव आदींनी अभिवादन केले. त्यानंतर आझाद मैदानावर उपोषणाला सुरवात करण्यात आली. युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, सचिव श्रीकांत कदम, अमित देसाई, जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, माजी महापौर सरिता पाटील, नगरसेवक विजय भोसले, विनायक गुंजटंकर, सुधा भातकांडे, मोहन भांदुर्गे, आर. आय. पाटील, धनंजय पाटील, चेतन कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Devendra Phadanvis comment