बुलंदशहर हिंसाचारामागे कट- पोलिस महासंचालक

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या हिंसाचारामागे कट असल्याचा संशय पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी बुधवारी व्यक्त केला. बाबरी मशीद पतनाच्या तीन दिवस आधी हा हिंसाचार झाल्यामुळे त्यांनी हा संशय व्यक्त केला आहे.

लखनौ- उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या हिंसाचारामागे कट असल्याचा संशय पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी बुधवारी व्यक्त केला. बाबरी मशीद पतनाच्या तीन दिवस आधी हा हिंसाचार झाल्यामुळे त्यांनी हा संशय व्यक्त केला आहे.

बुलंदशहरात तीन डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात पोलिस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्यासह सुमीत कुमार हा युवक ठार झाले होते. गोहत्या झाल्याच्या संशयावरून हा हिंसाचार घडला होता. हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न नसल्याचे ओ. पी. सिंह यांनी सांगितले. गोहत्येसह अन्य कारणांचाही तपास सुरू असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात गोहत्या आणि हिंसाचार, असे दोन एफआयआर दाखल झाले आहेत. एफआयआरमध्ये नावे असलेल्यांचा पोलिस शोध घेत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, स्थानिक पोलिसांनी वेळीच स्थितीवर काबू मिळविल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या हिंसाचारात ठार झालेले पोलिस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (ता. 6) भेट घेणार आहेत. लखनौमधील कालिदास मार्गावरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. सुबोधकुमार सिंह यांच्या पत्नीला 40 लाख, तर आई-वडिलांना दहा लाख रुपयांची मदत योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केली असून, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले आहे.

Web Title: UP DGP OP Singh calls incident in Bulandshahr a big conspiracy