कर्नाटकी पोलिसांचे एकच काय ५६ गुन्हे घ्यायला तयार - मुंडे

कर्नाटकी पोलिसांचे एकच काय ५६ गुन्हे घ्यायला तयार  - मुंडे

बेळगाव - सीमावासी मराठी बांधव कर्नाटकात अन्याय झेलत आहेत. त्यांच्यासाठी कर्नाटकी पोलिसांचे एकच काय ५६ गुन्हे घ्यायला तयार आहे. पोलिसांच्या कारवाईला मी भीक घालत नाही, असे सणसणीत प्रत्युत्तर महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दिले.

मध्यवर्ती म. ए. समितीने व्हॅक्‍सिन डेपो मैदानाजवळील रस्त्यावर सोमवारी (ता. १०) आयोजित केलेल्या महामेळाव्यात श्री. मुंडे यांनी केलेल्या घणाघाती भाषणामुळे कर्नाटक सरकार चांगलेच धास्तावले आहे. या मेळाव्यातील त्यांच्या भाषणाला प्रक्षोभक ठरवत त्यांच्याविरुध्द सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याची माहिती समिती नेत्यांनी मंगळवारी श्री. मुंडे यांना दिली. त्यावर त्यांनी या कृतीबाबत संताप व्यक्त करत कर्नाटकी पोलिसांना फटकारले. सीमाभागातील आपल्या मराठी बांधवांसाठी असे एक नाही तर ५६ गुन्हे दाखल झाले तरी मी त्याला भीत नाही. यापुढे सीमावासीयांच्या प्रत्येक लढ्यात त्यांच्यासोबत असेन, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.

महामेळाव्यासाठी उपस्थित राहता येऊ नये यासाठी कर्नाटक सरकारने त्यांना प्रोटोकॉल नाकारला. इतकेच नव्हे तर दोन दिवस कर्नाटक पोलिस त्यांच्या मागावर होते. मात्र, पोलिसांना गुंगारा देत त्यांनी रविवारी रात्रीच बेळगाव गाठले.

महामेळाव्याला उपस्थित राहून जोरदार भाषणही केले. त्यांच्या या भाषणामुळे कर्नाटक सरकारचा चांगलाच तिळपापड उडाला. कर्नाटक सरकारविरुध्द रस्त्यावर, न्यायालयात, सभागृहात शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार करताना या आंदोलनात युवकांनी आता पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत युवकांच्या भावनाही मुंडे यांनी चांगल्याच पेटवल्या होत्या. त्यामुळे पित्त खवळलेल्या कर्नाटक सरकारने त्यांच्याविरुध्द प्रक्षोभक भाषण केल्यावरून गुन्हा दाखल केला आहे. श्री. मुंडे यांच्यासह कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, अरविंद पाटील, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, निंगोजी हुद्दार यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com