कर्नाटकातील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या डी. रुपा यांची बदली

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जुलै 2017

शशिकला यांच्यासाठी सर्वसुविधांनी तुरुंगात किचनही तयार करण्यात आले आहे अशी माहीती रूपा यांनी उघड केली होतीे. कर्नाटक कारागृह विभागाचे महानिरीक्षक एच. एन. सत्यनारायण राव यांनाही दोन कोटीचा लाभ झाल्याचा आरोपही रुपा यांनी केला होता.

बंगळूरु : बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कर्नाटकातील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचे उघड करणाऱ्या कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकारी डी. रुपा यांच्यासह दोघांची आज तातडीने बदली करण्यात आली. सरकारच्या या बदली आदेशाबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

डी. रुपा या पोलिस उपमहानिरीक्षक आहेत. त्या एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत. तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची मैत्रिण शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यापूर्वी बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी चार वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. कर्नाटकातील बेंगलुरू येथील मध्यवर्ती कारागृहात त्या आहेत. शशिकला व्हीव्हीआयपी असल्याने त्यांना तुरूंगातही हीच सुविधा हवी होती. तुरूंगातही आरामदायी आयुष्य जगता यावे यासाठी चक्क दोन कोटी रूपयांची लाच दिली असे रुपा यांनी उघड केल्यानंतर देशभर चर्चेला उधाण आले होते. 

शशिकला यांच्यासाठी सर्वसुविधांनी तुरुंगात किचनही तयार करण्यात आले आहे अशी माहीती रूपा यांनी उघड केली होतीे. कर्नाटक कारागृह विभागाचे महानिरीक्षक एच. एन. सत्यनारायण राव यांनाही दोन कोटीचा लाभ झाल्याचा आरोपही रुपा यांनी केला होता. 

शशिकला या एका पक्षाच्या नेत्या असल्या तरी त्या कैदी आहेत. त्यामुळे त्यांना इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक मिळावी. यासाठी रुपा या आग्रही होत्या. मात्र, रुपा यांना शाबासकी मिळण्याऐवजी शिक्षाच मिळाली आहे. शशिकला यांच्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ज्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात दिले होते. 

विशेष म्हणजे इतका मोठा भ्रष्टाचार उघड केला असताना रुपा यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याऐवजी हाती बदलीचे पत्र देण्यात आले आहे. रुपा यांच्यावर अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती किंवा पुर्वकल्पना न देता प्रसारमध्यांमध्ये माहिती लीक केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Web Title: DIG Prisons D Roopa who exposed VIP treatment to Sasikala in Bengaluru jail transferred to traffic department