ठसा डिजिटल 2016 चा 

नंदकुमार सुतार
सोमवार, 19 डिसेंबर 2016

वर्ष 2016 अखेरच्या मोडवर आहे. हे वर्ष डिजिटल वर्ल्डसाठी खूपच धामधुमीचे ठरले. तंत्रज्ञानामध्ये अनेक नवीन बाबींचा समावेश झाला. मोबाईलच्या विश्‍वात मोठे बदल झाले. भारताला "फोर-जी'ची भेट याच वर्षात मिळाली. इंटरनेट विश्‍वात त्यामुळे मोठी क्रांती होण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी सरत्या वर्षात काही ब्रॅंड्‌स, ऍप्सनी तुफान धुमाकूळ घातला आणि ग्राहकांना चांगलीच भुरळ पाडली. कॅशलेस इंडियाचे स्वप्न "आयसीटी'च्या बळावरच पाहिले जात आहे. 2016 मध्ये आपला आगळावेगळा ठसा उमटवून डिजिटल विशेषत: मोबाईल मार्केटची समीकरणे बदलणारे कोण होते आणि त्यांनी ते कसे साध्य केले....?

वर्ष 2016 अखेरच्या मोडवर आहे. हे वर्ष डिजिटल वर्ल्डसाठी खूपच धामधुमीचे ठरले. तंत्रज्ञानामध्ये अनेक नवीन बाबींचा समावेश झाला. मोबाईलच्या विश्‍वात मोठे बदल झाले. भारताला "फोर-जी'ची भेट याच वर्षात मिळाली. इंटरनेट विश्‍वात त्यामुळे मोठी क्रांती होण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी सरत्या वर्षात काही ब्रॅंड्‌स, ऍप्सनी तुफान धुमाकूळ घातला आणि ग्राहकांना चांगलीच भुरळ पाडली. कॅशलेस इंडियाचे स्वप्न "आयसीटी'च्या बळावरच पाहिले जात आहे. 2016 मध्ये आपला आगळावेगळा ठसा उमटवून डिजिटल विशेषत: मोबाईल मार्केटची समीकरणे बदलणारे कोण होते आणि त्यांनी ते कसे साध्य केले....? यादी खूप मोठी आहे; पण आपण मोबाईल जगतातील "टॉप फाइव्ह'चा विचार करू शकतो की नाही? 

गॅलक्‍सी एस7 एज्‌ 
मार्च महिन्यात सॅमसंगने गॅलक्‍सी एस 7 एज्‌ हा दोन्ही बाजूंनी वक्राकार (कर्व्हड्‌ एज्‌) डिस्प्ले असलेला एकदम स्लिम स्मार्टफोन भारतात सादर केला. नोट एज्‌ने बाजारात स्थान मिळविल्याने सॅमसंगचा आत्मविश्‍वास वाढला आणि एस 7 एज्‌ आणण्याचे धाडस कंपनीने दाखवले. मोठा डिस्प्ले असतानाही केवळ कर्व्हड एजमुळे तो त्याच आकाराच्या स्मार्टफोनपेक्षा लहान दिसतो. मात्र तरीही एकदम "हट के लूक' आणि नवे फीचर्स, वॉटर रझिस्टन्ट आणि उत्तम दर्जाच्या हार्डवेअरमुळे मोबाईलप्रेमींनी तो खिशात टाकला. त्याचे बॅटरी लाईफ आणि स्पीडदेखील उत्तम असल्याने किंमत अधिक असली तरी आयफोनला कंटाळलेल्या लोकांनी एस 7 एज्‌ला पसंती दिली. मध्यंतरी एलजीने कर्व्हड्‌ स्क्रीनचा मोबाईल आणला, पण हा प्रयोग पूर्णपणे फसला. केवळ कडा वक्राकार करण्याचा सॅमसंगचा प्रयोग मात्र यशस्वी झाल्याने नव्या वर्षात असे आणखी मोबाईल तुमच्या भेटीला येऊ शकतात. 

आयफोन 7 प्लस 
गेल्या ऑक्‍टोबरमध्ये "आयफोन 7 प्लस' ची भारतीय मार्केटमध्ये एन्ट्री झाली. ऍपलने "आयफोन 7' नंतर "आयफोन 7 प्लस' आणला. तसे वरकरणी पाहायला गेले तर दोन्ही फोनमध्ये फारसा फरक दिसणार नाही. मात्र प्लसमध्ये अनेक नवे फीचर्स समाविष्ट करण्यात आले. किंमत नेहमीप्रमाणे खूप अधिक असली तरी आयफोन नावाला असलेले वलय आणि बरेच आंतरिक बदल करून साकारलेला नवा अवतार यामुळे आयफोन 7 प्लसवरही उड्या पडल्या. मोबाईलच्या बाजारात त्याने आपली आघाडी म्हणूनच टिकवून ठेवली. यात नवे काय आहे? तो जलरोधक आहे. बॅटरी लाइफ वाढल्याने एक ते दीड दिवस आरामात चालतो. सर्वात मोठा बदल म्हणजे 3.5 मिमी हेडफोन जॅकला दिलेली सुटी आणि रिअर ड्युअल कॅमेरा अर्थात मागच्या बाजूला शेजारी-शेजारी दोन कॅमेरे. ज्यामुळे आयफोन 7 प्लसच्या फोटोंचा दर्जा इतर कोणत्याही मोबाईल फोनपेक्षा सरस ठरतो. ड्युअल कॅमेऱ्यांची कल्पना चांगलीच रुजणार असे दिसते. आतापर्यंतच्या सिंगल कॅमेऱ्यांपेक्षा या जोडगोळीने टिपलेले फोटो निश्‍चितच मनोहारी आणि वास्तवता उभी करणारे आहेत. त्यामुळे ड्युअल कॅमेरा फोनची चलती 2017 मध्ये पाहायला मिळेल. त्याची झलक "ऑनर'ने दाखवून दिली आहे. 

वनप्लस 3 
वनप्लस, वनप्लस 2 आणि 2016 मध्ये वनप्लस 3.... तीस हजारांच्या रेंजमध्ये यासारखा दुसरा स्मार्टफोन शोधून सापडणार नाही. रॅममध्ये बदल करून 6 जीबी क्षमता केल्याने हा स्मार्टफोन तरुणाईमध्ये चर्चेचा विषय ठरला. त्याची ओएस "ऑक्‍सिजन' ही अँड्रॉइडसारखी असल्याने ग्राहकांनी पसंत केली. रिअर कॅमेरा 18 एमपी आणि फ्रंट कॅमेरा 8 एमपी क्षमतेचा असल्याने त्याच्या फोटोची गुणवत्ताही खूप चांगली आहे. कमी किमतीत चांगला मोबाईल कसा असावा याचा बेंचमार्कच जणू वनप्लस 3 ने निर्माण केला होता. अनेक देशी कंपन्या त्याला आदर्श मानून आपले मॉडेल डिझाइन करत होती. वनप्लसच्या सुरवातीच्या मॉडेलची बॅटरी फारसी चांगली नव्हती. त्यात चांगली सुधारणा करून वनप्लस 3 अधिक क्षमतेचा करण्यात आला. त्यामुळे तुम्ही तो कसाही वापरला तरी किमान दिवसभर तरी त्याची पॉवर टिकणारच. तसेच अवघ्या दहा मिनिटांत 60 टक्के चार्ज होतो. केवळ "लूक'चा विचार केल्यास हा स्मार्टफोन तेवढा खुणावत नाही, मात्र हातात घेताच त्याची महती कळते. शिवाय कार्यक्षमतेला तोड नाही. 

जी 5 
एलजी या कोरियन कंपनीचा स्मार्टफोन क्षेत्रातील वाटा खूप कमी असला तरी ती सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयोग करत असते. कर्व्हड्‌ डिस्प्लेवाला मोबाईल फोन काढायचे धाडस याच कंपनीचे. मोबाईलची पुढची पिढी मॉड्युलरची (किंवा मॉज्युलर) राहील याची झलक या वर्षाच्या सुरवातीला एलजीने लॉंच केलेल्या "जी 5' या स्मार्टफोनमुळे मिळाली. एलजीचा एक वेगळा ग्राहकवर्ग आहे. घरातल्या सगळ्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तू केवळ एलजी ब्रॅंडच्याच वापरणारे लोकदेखील आहेत. त्यामुळे सुमारे 55 हजारांच्या रेंजमधला काहीसा महागडा असणारा हा फोन अशा लोकांनी पटकन आपलासा केला. तो पहिला मॉड्‌युलर स्मार्टफोन मानला तरी काही हरकत नसावी. मॉड्युलर फोनचा संकल्प आधी गुगलने सोडला होता. मात्र त्याला हा प्रोजेक्‍ट गुंडाळावा लागला. पुढे एलजीने जी 5 बाजारात उतरवला. त्याचबरोबर लेनेवोनेही त्याच्या पावलावर पाऊल टाकले आणि मॉड्युलरची वाट आम्ही चालूच ठेवणार हे दाखवून दिले. चार - पाच पार्ट मिळवून आपणाला हवा तसा स्मार्टफोन तयार करण्याची ही संकल्पना खरोखरच नावीन्यपूर्ण आहे. जी 5 ने स्वतंत्र कॅमेरा, स्पीकर्स आणि बॅटरीचे मॉड्युलर स्पेअर्स फोनसोबत दिले होते. त्यामुळे फोन वापरण्याची मजा द्विगुणित होते. 2017 मध्ये असे हट के प्रयोग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील. 

जियो 
रिलायन्सने सप्टेंबरमध्ये बडा धमाका केला आणि एका महिन्यात तब्बल दीड कोटी ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढले. त्याच्या फोर-जीबाबत आधीच साऱ्यांना उत्सुकता होती. मात्र सारे काही फुकट मिळेल असे कोणालाही वाटले नव्हते. "वेलकम ऑफर' म्हणून रिलायन्सने साऱ्या सुविधा व्हॉइस कॉलपासून डेटापर्यंत नि:शुल्क देऊ केल्या. त्यामुळे भारतातील मोबाईल टेलिफोनीचे विश्‍व गदागदा हलले. मुकेश अंबानी यांनी सगळ्यांचे ठोकताळे चुकवले. नवी स्पर्धा निर्माण केली. त्यामुळे स्पर्धक कंपन्यांनी घाई - गडबडीत त्यांची फोर - जी नेटवर्क ऑन केली. अनेक ऑफरचा भडिमार केला. पण काही दिवसांतच या साऱ्यांचे फोर - जी नेटवर्क म्हणजे 'वन टू का फोर' असल्याचा अनुभव ग्राहकांना येऊ लागला आहे. खरी कसोटी आहे ती नव्या वर्षात. ग्राहकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि कनेक्‍शनचा भार हे सहन कसे करणार आणि चांगली सर्व्हिस कशी देणार अशी आव्हाने त्यांच्यासमोर असतील.

Web Title: digital impression 2016