आता ट्रेनमध्ये तुमचे सामान चोरीला नाही जाणार, ओटीपीशिवाय उघडणार नाही दरवाजा... - Digital Lock System luggage not be stolen train door not open without OTP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Digital Lock System

Digital Lock System : आता ट्रेनमध्ये तुमचे सामान चोरीला नाही जाणार, ओटीपीशिवाय उघडणार नाही दरवाजा...

Digital Lock System In Train: बऱ्याचदा आपण रेल्वेतून सामान पाठवताना चोरीला जाईल म्हणून घाबरत असतो. पण आता मालगाड्या आणि पार्सल गाड्यांमधील वस्तूंचं चोरीपासून संरक्षण करण्यासाठी भारतीय रेल्वेने OTP आधारित 'डिजिटल लॉक सिस्टम' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून प्रवाशांकडून पार्सल केला जाणारा माल चोरीपासून वाचवता येईल. म्हणजे आता तुम्ही तुमचे पार्सल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणत्याही त्रासाशिवाय आणि तणावाशिवाय ट्रेनमधून नेऊ शकता.

भारतीय रेल्वे मालवाहतूक आणि पार्सल गाड्यांमधील मालाची वाहतूक करताना मालाचे संरक्षण करण्यासाठी 'वन टाइम पासवर्ड' (OTP) तंत्रज्ञानावर आधारित नवीन 'डिजिटल लॉक' प्रणाली सुरू करणार आहे. याविषयी एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, ही प्रणाली वस्तू आणि पार्सलसाठी वाढीव सुरक्षा प्रदान करेल. यामुळे रेल्वे वाहतुकीदरम्यान चोरीच्या घटना कमी होतील आणि प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.

ट्रेनमध्ये स्मार्ट लॉक बसवण्यात येणार...

रेल्वेचं म्हणणं आहे की ट्रकमध्ये वापरल्या जाणार्‍या पध्दतीप्रमाणेच वस्तू आणि पार्सल घेऊन जाणाऱ्या गाड्यांमध्ये जीपीएस-सक्षम 'स्मार्ट लॉक' बसवले जातील. जीपीएस प्रणालीद्वारे वाहनाचे लोकेशन ट्रेस करता येईल, त्यामुळे चोरीची शक्यता कमी होईल. नवीन प्रणाली पूर्णपणे सुरक्षित ओटीपीवर आधारित असेल, ज्याचा वापर ट्रेनच्या डब्याचे दरवाजे उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी केला जाईल.

OTP द्वारे डबा उघडला जाईल..

प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात प्रवेश करणे शक्य होणार नाही कारण डब्बा ओटीपीद्वारे उघडला जाईल आणि नंतर दुसर्‍या ओटीपीने लॉक केला जाईल. याशिवाय डबे सील केले जातील आणि छेडछाड रोखण्यासाठी प्रत्येक स्थानकावर सील लावून निरीक्षण केले जाईल. उल्लंघन झाल्यास अधिकाऱ्याच्या मोबाईल क्रमांकावर ताबडतोब अलर्ट मेसेज पाठवला जाईल.

नवीन प्रणालीमुळे चोरीच्या घटना कमी होण्यास मदत होईल..

लोडिंग किंवा अनलोडिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे हे सांगण्यासाठी प्रत्येक स्टेशनवरील रेल्वे कर्मचाऱ्याला ओटीपी दिला जाईल. वाजवी दरात ही सेवा देऊ शकतील अशा कंपनीच्या शोधात रेल्वे आहे. ओटीपीवर आधारित नवीन 'डिजिटल लॉक' प्रणाली, जी मालगाड्या आणि पॅकेज ट्रेनमध्ये स्थापित केली जाईल, वाहतुकीदरम्यान मालाची सुरक्षा वाढवेल. या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हे एक सकारात्मक पाऊल आहे ज्यामुळे रेल्वे वाहतूक उद्योगातील चोरीच्या घटना कमी होण्यास मदत होईल.