दहशतवादी नक्की पळूनच गेले; का...:दिग्विजय

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

सिमी व बजरंग दल या संघटना मिळून दंगल घडवितात. अशा वेळी हे दहशतवादी पळून गेल्याने कोठे दंगल घडविली जात नाही ना, याकडे प्रशासनास लक्ष ठेवावे लागेल. याआधी खंडवा येथूनही अशाच प्रकारे दहशतवादी पळून गेले होते आणि आता भोपाळमधूनही दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत 

नवी दिल्ली - भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहामधून सिमीचे आठ दहशतवादी पळाल्यानंतर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. सिमीचे हे दहशतवादी ज्या प्रकारे पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरले; त्यावरुन त्यांना तुरुंगामधून बाहेर पडू देणे हाच उद्देश नव्हता ना, या शक्‍यतेची चौकशी करावयास हवी, असा गंभीर आरोप सिंह यांनी केला आहे. हे दहशतवादी पळून गेले आहेत; का पळविण्यात आले आहेत, अशी विचारणा त्यांनी केली आहे. 
 

सिंह म्हणाले - 
# सिमी व बजरंग दल या संघटना मिळून दंगल घडवितात. अशा वेळी हे दहशतवादी पळून गेल्याने कोठे दंगल घडविली जात नाही ना, याकडे प्रशासनास लक्ष ठेवावे लागेल. याआधी खंडवा येथूनही अशाच प्रकारे दहशतवादी पळून गेले होते आणि आता भोपाळमधूनही दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत 
# सिमी व बजरंग दल या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याची शिफारस तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारकडे केली होती. मात्र यानंतर केवळ सिमीवर बंदी घालण्यात आली. 

दरम्यान, भोपाळमधील मध्यवर्ती कारागृहातून रविवारी रात्री फरार झालेल्या सिमी या दहशतवादी संघटनेच्या आठ दहशतवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. भोपाळपासून 10 किमी अंतरावरील इंदखेडी गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली.

दहशतवाद्यांनी रविवारी मध्यरात्री धारदार शस्त्राने सुरक्षारक्षक रमा शंकर यांची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर चादरींचा वापर करून कारागृहाची भिंत पार करून पलायन केले. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शहरात नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच काही पथकेही बनविण्यात आली होती. पोलिसांना फरार दहशतवाद्यांचा माहिती मिळाल्यानंतर त्यांना गोळीबारात ठार मारण्यात आले. अमजद, जाकिर हुसैन सिद्दीकी, मोहम्मद सालिक, मुजीब शेख, मेहबूब गुड्डू, मोहम्मद खालिद, अकील व माजिद अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या प्रकरणाचा सविस्तार अहवाल मागविला आहे.

 

Web Title: Digvijay raise questions over escape of Simi Terrorists