भाजप, बजरंग दलाला पाकच्या ‘आयएसआय’चे फंडिंग?; काँग्रेस नेत्याचा आरोप

वृत्तसंस्था
Sunday, 1 September 2019

बजरंग दलाने दिग्विजयसिंह यांच्या आरोपांची गंभीर दखल घेतली असून, त्यांच्या विरोधात कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दिग्विजयसिंह यांच्या विधानावर भाजपनेही टीका केली आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता भाजप आणि बजरंग दलावर केलेल्या आरोपामुळे दिग्विजय सिंह पुन्हा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी भारतात मुस्लिमांपेक्षा बिगर मुस्लिमच जास्त हेरगिरी करतात, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. त्याचबरोबर भाजप आणि बजरंग दल आयएसआयकडून पैसे घेत असल्याचा आरोपही दिग्विजयसिंह यांनी केला आहे.

उदयनराजे भाजपमध्ये नाही तर, ‘या’ पक्षात करणार प्रवेश

बजरंग दल दावा ठोकणार
बजरंग दलाने दिग्विजयसिंह यांच्या आरोपांची गंभीर दखल घेतली असून, त्यांच्या विरोधात कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दिग्विजयसिंह यांच्या विधानावर भाजपनेही टीका केली आहे. दिग्विजयसिंह म्हणाले, ‘पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयसाठी मुस्लिमांपेक्षा बिगर मुस्लिम जास्त हेरगिरी करतात. बजरंग दल आणि भाजप आयएसआयकडून पैसे घेत आहेत. यावर थोडे लक्ष ठेवायला हवे. मोदींच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था बिघडत आहे. तरुणांकडे नोकऱ्या नाहीत. नुकसान भरून काढण्यासाठी आरबीआयचा आधार घेण्यात आला. आता मोदींनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायला हवे.’

विधानसभेवर भाजपचाच झेंडा; मुख्यमंत्र्यांनी टाळला शिवसेनेचा नामोल्लेख

‘...प्रश्न केला तर देशद्रोही ठरवतात’
तत्पूर्वी, दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ला हा आपल्या गुप्तचर विभागाचे मोठे अपयश असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले, ‘दुसऱ्या एखाद्या देशात अशी घटना घडली असती तर, पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांनी राजीनामे दिले असते. पण, इथं या विषयांवर कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही आणि उपस्थित केलाच तर त्याला देशद्रोही ठरवले जाते.’ लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह यांचा भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पराभव केला होता. भोपाळमधील ही निवडणूक देशभरात लक्षवेधी ठरली होती. त्यावेळी साध्वी प्रज्ञा यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या विरोधात एक वादग्रस्त विधान केले होते. त्यावर दिग्विजयसिंह यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, ‘संघाच्या विचारांच्या विरोधात कोणी विधान केले तर, त्याला देशद्रोही ठरवले जाते. जर, संघाला शहीदही आवडत नाहीत तर, ते सैतान आहेत.’

...अन्यथा विष्ठा खाण्याची तयारी ठेवा; सदाभाऊंची जीभ घसरली

आरोपांमागे काय आहे कारण?
दिग्विजयसिंह यांच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. परिणामी दिग्विजयसिंह यांना या विषयी खुलासा करावा लागला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याविषयी खुलासा केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी भाजपवर आएसआयसाठी हेरगिरी केल्याचा आरोप केल्याचे वृत्त काही न्यूज चॅनेल देत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे. बजरंग दल आणि भाजपच्या आयटी सेलच्या काही पदाधिकाऱ्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी पकडले आहे. हे पदाधिकारी आयएसआयकडून पैसे घेऊन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते. मी या आरोपावर पूर्णपणे ठाम आहे. न्यूज चॅनेलनी या विषयी भाजपला विचारणा करायला हवी. ते का विचारत नाहीत?’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: digvijay singh controversial statement bajrang dal bjp pakistan isi non muslim spy