दिल्ली-मुंबई-तेल अवीव थेट विमानसेवा

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

या वेळी मोदी यांनी मूळ भारतीय असलेल्या इस्रायली किंवा ज्यू नागरिकांसाठी ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजन (पीआयओ) कार्ड देण्यासंबंधीची प्रक्रिया सुलभ बनविली जाईल, असे आश्‍वासनही दिले

जेरुसलेम, ता. 6 (यूएनआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली. दिल्ली-मुंबई-तेल अवीव दरम्यान ही विमानसेवा असणार आहे.

दिल्ली-मुंबई-तेल अवीव विमानसेवा लवकरच सुरू होईल आणि इस्राईलच्या युवकांना मी भारताला भेट देण्याचे निमंत्रण देतो, असे आवाहन मोदी यांनी येथील भारतीय समुदायासमोर भाषणादरम्यान केले. एअर इंडियाने यापूर्वीच दिल्ली आणि तेल अवीव दरम्यान थेट विमानसेवेची घोषणा केली होती आणि मे-जूनमध्ये ही सेवा सुरू करण्याचा विचार होता. मात्र, काही देशांच्या हवाई हद्दीतील आरक्षणामुळे ही सेवा सुरू होऊ शकली नाही.

या वेळी मोदी यांनी मूळ भारतीय असलेल्या इस्रायली किंवा ज्यू नागरिकांसाठी ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजन (पीआयओ) कार्ड देण्यासंबंधीची प्रक्रिया सुलभ बनविली जाईल, असे आश्‍वासनही दिले. इस्रायली लष्करात काम करणाऱ्या भारतीय समुदायाच्या नागरिकांना ओसीआय कार्ड देण्यासंबंधीचा विचार सुरू आहे.

त्यांनी इस्राईलमध्ये एक भारतीय सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याचीही घोषणा केली. या वेळी त्यांच्यासोबत इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूही उपस्थित होते. त्यांनीही व्यासपीठावर येत 6 हजार भारतीयांचे "नमस्ते' म्हणत स्वागत केले. आपल्या दरम्यान एक मानवी पूल असल्याचे आम्ही नेहमीच लक्षात ठेवतो. आम्ही तुमचा आदर करतो. तुमच्यावर प्रेम करतो, असे नेतान्याहू म्हणाले.

"त्या' हल्ल्याच्या तपासाची विनंती
2012 मध्ये नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा तपास करण्याची विनंती इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी झालेल्या चर्चेदरम्यान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याची माहिती एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त आहे. इस्राईलने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले होते. मात्र, भारताने हा दावा फेटाळला होता.

भारतीय हुतात्मा जवानांना आदरांजली
नरेंद्र मोदी यांनी इस्राईल दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी आज (गुरुवारी) हायफा शहरात जाऊन पहिल्या जागतिक युद्धादरम्यान हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांना आदरांजली वाहिली. 1918 मध्ये भारतीय जवानांनी इस्राईलच्या हायफा शहराला जर्मन आणि तुर्की लष्कराच्या ताब्यातून मुक्त केले होते. या युद्धात 44 भारतीय जवान हुतात्मा झाले होते. मोदी आणि इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या हस्ते या वेळी स्मृतिस्थळाचे अनावरण करण्यात आले.

Web Title: Direct Air Service between Tel Aviv and New Delhi