कोरोना रुग्णांबाबत भेदभाव संतापजनक - उपराष्ट्रपती नायडू 

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 27 July 2020

नायडू यांनी म्हटले की, रुग्णांबाबत भेदभाव करण्याच्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. संक्रमित रुग्णांना मदत आणि संवेदनशीलतेची जेव्हा अपेक्षा असते त्याच वेळी समाज त्यांच्याशी अशी क्रूर वागणूक करतो.

नवी दिल्ली - कोरोना संक्रमित रुग्णांबाबत समाजाकडून होणाऱ्या भेदभावाबाबत उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे. कोरोना रुग्णांचे अंत्यसंस्कारदेखील योग्य पद्धतीने, सन्मानाने केले जात नाहीत आणि अशा मानसिकतेच्या वृत्तींना मुळापासून उखडून टाकायला हवे, अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली. 

कोरोना रुग्णांबद्दल भेदभाव करणाऱ्या सामाजिक कुप्रवृत्तींना रोखण्यासाठी समाजानेच पुढे यावे, असे आवाहन उपराष्ट्रपती नायडू यांनी आज केले. नायडू यांनी म्हटले की, रुग्णांबाबत भेदभाव करण्याच्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. संक्रमित रुग्णांना मदत आणि संवेदनशीलतेची जेव्हा अपेक्षा असते त्याच वेळी समाज त्यांच्याशी अशी क्रूर वागणूक करतो, हे निरोगी समाजाचे लक्षण नाही. हा अदृश्य तेवढाच घातक विषाणू आहे. तो कोणालाही आणि कधीही संक्रमित करू शकतो. एकही माणूस त्यापासून कायमस्वरूपी सुरक्षित नाही. मानवता, दया आणि करुणा हीच ज्या भूमीची संस्कृती  आहे अशा भारतामध्ये कोरोना रुग्णांबद्दलच्या या भेदभावपूर्ण मानसिकतेला थारा नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘अंत्यसंस्कारावेळी रुग्णांच्या मृतदेहांचीही अवहेलना करण्याचे प्रकार घडतात हे संतापजनक आहे. जेथे शोकसंतप्त कुटुंबीयांना सांत्वन देण्याची गरज आहे तेथे मृतदेहालाही योग्य सन्मान न देणे हे भारतीय मूल्यांच्या विरोधात आहे. असे प्रकार घडण्यामागे मुख्य कारण या संसर्गाबद्दल पुरेशी जागृती आजही समाजात नाही. त्यामुळेच वेगवेगळ्या अंधश्रद्धांना आणि अनिष्ट समजुतींना जन्म मिळतो. कोरोनाबाबत आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रसारमाध्यमांनी आपली भूमिका अधिक सजगपणे बजावणे आवश्यक आहे,’ असे नायडू म्हणाले. या संसर्गाबद्दल व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरजही नायडू यांनी व्यक्त केली. 

नायडू उवाच... 
- कोरोनाच्या वेढ्यातून भारत निश्चितपणे लवकरच मुक्त होईल 
- रुग्णसंख्येचा वाढता आकडा स्थिर होणे आवश्‍यक 
- नागरिकांनी अधिक जबाबदारीने वर्तन करणे अपेक्षित 
- प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगसाधनेचाही मोठा उपयोग 
- कोरोना योद्ध्यांचा उत्साह वाढवण्यासाठी समाजाने पुढे यावे 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discrimination against corona patients is annoying says Vice President Naidu