'सिमी'च्या कार्यकर्त्यांच्या एन्काउंटरवरून वाद

पीटीआय
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

तुरुंगातून पळून गेलेल्या आठ जणांना चकमकीत मारल्यावरून शंका
भोपाळ - येथील मध्यवर्ती तुरुंगात कच्च्या कैदेत असताना रक्षकाची हत्या करून पळून गेलेल्या स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेच्या आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी तातडीने पाठलाग करत एका चकमकीत ठार मारले. मात्र, या चकमकीबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. राज्य सरकारने कैदी पळून जाण्यास जबाबदार असलेल्या चार पोलिसांना निलंबितही केले आहे.

काल (ता. 31) पहाटे हे कैदी चादरींचा दोर तयार करून तीस फुटी भिंतीवरून पळून गेले होते. नंतर स्थानिकांच्या मदतीने शहराच्या बाहेरपर्यंत त्यांचा माग काढला आणि त्यांना वेढा घातला. या वेळी कैद्यांनी शरण येण्यास नकार दिल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते मारले गेले. अमजद, झाकीर हुसेन सादिक, महंमद सादिक, मुजीब शेख, महमूद गुड्डू, महंमद खालिद अहमद, अकील अणि माजीद अशी या मारल्या गेलेल्यांची नावे आहेत. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या पोलिस कारवाईच्या एका व्हिडिओमध्ये एक पोलिस अधिकारी एका कैद्याला जवळून गोळ्या मारत असताना दिसत आहे. सिमी या संघटनेवर बंदी आहे. कारवाईत मारल्या गेलेल्यांपैकी दोघे जण तीन वर्षांपूर्वीच्या एका तुरुंगफोडीच्या प्रकारातही सहभागी होते.

पोलिसांनी बनावट चकमकीद्वारे या कैद्यांना मारल्याचा आरोप होत असून, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या प्रकरणाची चौकशी करणार आहे. कैदी पळून जाताच सरकारने त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करत प्रत्येकावर पाच लाख रुपयांचे इनामही जाहीर केले होते. तसेच, मध्य प्रदेश सरकारने तुरुंग अधीक्षकासह चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या पळून गेलेल्या कैद्यांकडे शस्त्रे होती आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, असे पोलिस महानिरीक्षक योगेश चौधरी यांनी सांगितले. मात्र, राज्याचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी कैद्यांनी पळून जाताना तुरुंगात त्यांच्याकडे असलेली ताटे आणि चमच्यांच्या साह्याने हल्ला केल्याचे प्रतिक्रिया देताना सांगितले.

वाहिन्यांवर दाखविलेल्या चकमकीच्या फुटेजशी मात्र या दोन्ही प्रतिक्रिया जुळत नसल्याने शंका निर्माण झाल्या आहेत.

या प्रकरणाची एनआयएकडून चौकशी होणार आहे. तसेच, याबाबत उपस्थित झालेल्या शंका पाहता राज्य सरकारही स्वतंत्रपणे चौकशी करणार आहे.
- शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश

Web Title: dispute on simi workers encounter