डॉ. जॅक सिकेरांच्या पुतळ्याचा वाद कायम
पणजी : गोव्याच्या सार्वमत कौलावेळी गोवा महाराष्ट्रात विलीन करू नये अशी ठाम भूमिका घेणारे पहिले विरोधी पक्षनेते डॉ. जॅक सिकेरा यांच्या पुतळ्याच्या वादात आता कॉंग्रेसने उडी घेतली आहे. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी विधानसभा संकुल परिसरात डॉ. सिकेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी कॉंग्रेसची पहिल्यापासून भूमिका आहे असे सांगितले.
पणजी : गोव्याच्या सार्वमत कौलावेळी गोवा महाराष्ट्रात विलीन करू नये अशी ठाम भूमिका घेणारे पहिले विरोधी पक्षनेते डॉ. जॅक सिकेरा यांच्या पुतळ्याच्या वादात आता कॉंग्रेसने उडी घेतली आहे. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी विधानसभा संकुल परिसरात डॉ. सिकेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी कॉंग्रेसची पहिल्यापासून भूमिका आहे असे सांगितले.
डॉ. सिकेरा यांचा पुतळा उभारावा अशी मागणी उपसभापती मायकल लोबो यांनी वर्षभरापूर्वी लावून धरली होती. गोवा फॉरवर्ड या भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्षाने त्याला पूर्णतः समर्थन दिले होते. मात्र भाजप सरकारने ती मागणी मान्य केली नव्हती. जनमत कौलाचे डॉ. सिकेरा हे एकमेव कैवारी नव्हते इतर बरेचजण होते. एकट्याचा पुतळा उभारला तर इतरांवर अन्याय केल्यासारखे होईल. त्यामुळे त्या सर्वांचे पुतळे विधानसभा संकुलाऐवजी अन्य प्रशस्त जागेत उभारता येतील अशी भुमिका सरकारने घेतली होती. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर त्यावर ठाम राहिल्याने तो विषय पुढे कोणी वाढवला नव्हता.
आता मेरशीच्या चौकात डॉ. सिकेरा यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. गोवा फॉरवर्डपक्षाकडून त्या कार्यक्रमाची निमंत्रणे देण्यात आली होती त्यावरून तो पुतळा सरकारने नव्हे तर त्या्ंनीच आपल्या पातळीवर उभारल्याचे दिसते. काल (ता.16) त्या कार्यक्रमात बोलताना गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी पुढे विधानसभा संकुलातही डॉ.सिकेरांचा पुतळा उभारण्यात येईल. फक्त त्याला योग्यवेळेची प्रतीक्षा आहे असे सुचक उद्गार काढले. सत्ताधारी भाजपला हा डिवचण्याचाच प्रकार असताना त्यात कॉंग्रेस मागे राहणार नव्हती. या मुद्यावरून सत्ताधारी आघाडीत संघर्ष होतो तर पाहू या असा विचार करत विधानसभा संकुलात डॉ. सिकेरांचा पुतळा उभारावा असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे असे विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी सांगितले आहे. हे सांगतानाच त्यांनी विधानसभा संकुलाच्या आवारात पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा आहे त्याच शेजारी पहिले विरोधी पक्षनेते म्हणून डॉ. सिकेरांचा पुतळा उभारता येईल अशी पुस्ती जोडली आहे.
गोवा, गोमंतकीय आणि गोमंतकीयत्व यांच्या नावाने केलेले जाणारे राजकारण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कसे बदलत जाते ते आता दिसून येईल असे दिसते.