कर्नाटकात असंतुष्ट काँग्रेस आमदार भाजपच्या संपर्कात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

रमेश जारकीहोळी दिल्लीत 

बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काही आमदार दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. परंतु रमेश जारकीहोळी यांनी येडियुरप्पा यांची भेट घेतल्याच्या वृत्ताचे खंडन केले. कॉंग्रेसचे राज्य प्रभारी वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी आपण असल्याचे ते म्हणाले. जेडीएसमधील काही नाराज आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते.

बंगळूर : एकीकडे ऑपरेशन कमळची गरज नसल्याचे म्हणत भाजपने कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलातील (जेडीएस) असंतुष्ट आमदारांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पडद्याआडून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. काही कॉंग्रेस आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात असून, कोणत्याही क्षणी आमदारपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची त्यांनी तयारी दर्शविल्याचे सांगण्यात येते. 

असंतुष्ट आमदारांच्या हालचालींवर कॉंग्रेस नेते नजर ठेवून आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर करा, नाही तर पक्षाचे मोठे नुकसान होईल. काही असंतुष्ट आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत, असा इशारा स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे. प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ईश्वर खंड्रे यांनीही याबाबतीत चिंता व्यक्त केली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कॉंग्रेसच्या काही आमदारांशी सपर्क साधला असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव व मंत्री डी. के. शिवकुमार यांनीही ऑपरेशन कमळ संदर्भात चिंता व्यक्त केली. भाजपने पुन्हा ऑपरेशन कमळचा प्रयत्न चालविला आहे. सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. 

आमदार- येडियुप्पा भेट 

मंत्रिपद मिळविण्यासाठी कॉंग्रेसचे अनेक आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करून आपणास मंत्रिमंडळात स्थान द्यावे, नाहीतर आपला पर्यायी मार्ग असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्याच दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पाही दिल्लीत होते. विशेष म्हणजे कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार एम. बी. पाटील व येडियुरप्पा एकाच विमानातून दिल्लीला गेले होते. त्यामुळे पुन्हा औत्सुक्‍य वाढले आहे. मंत्रिपद मिळण्याची शक्‍यता नसलेल्या आमदारांनी दिल्लीत येडियुरप्पांची भेट घेऊन चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

रमेश जारकीहोळी दिल्लीत 

बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काही आमदार दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. परंतु रमेश जारकीहोळी यांनी येडियुरप्पा यांची भेट घेतल्याच्या वृत्ताचे खंडन केले. कॉंग्रेसचे राज्य प्रभारी वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी आपण असल्याचे ते म्हणाले. जेडीएसमधील काही नाराज आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते.
 

Web Title: dissatisfied Congress MLA from Karnataka are contacted with BJP