शांततेच्या लक्ष्मण रेषेचे भान पाळा; विचारवंत, गांधीवाद्यांचे कळकळीचे आवाहन

देशाच्या विविध भागांतून सध्या येणाऱया बातम्या व भारतातील सामाजिक शांततेला नख लावण्याचे चाललेले प्रयत्न अतिशय भितीदायक...
Social peace in India
Social peace in Indiasakal

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागांतून सध्या येणाऱया बातम्या व भारतातील सामाजिक शांततेला नख लावण्याचे चाललेले प्रयत्न अतिशय भितीदायक आहेत. अशांतीचा फैलाव करण्यासारखा अधर्म दुसरा नाही. त्यामुळे सामाजिक सौहार्द, बंधुभावाची परंपरा जपण्यासाठी भारतातील विचारी-विवेकी कार्यकर्त्यांनी व गांधीवाद्यांनी पुढाकार घेऊन जागृती करावी व देशवासीयांनीही या कटाला बळी पडू नये असे कळकळीचे आवाहन आघाडीच्या ९५ विचारवंत व गांधीवाद्यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

महात्मा गांधींच्या विचारांच्या प्रसार- प्रचाराचे कार्य करणाऱया अनेक संस्थांचे पदाधिकारी व विचारवंत आलेंचा यात समावेश आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून जे प्रश्न निर्माण केले जात आहेत व खुद्द सरकारच (स्टेट) यात जी भूमिका घेत आहे ती अत्यंत दुर्देवी असल्याचे रोखठोक प्रतिपादनही या विचारवंतांनी केले आहे.भारतीय राज्यघटनेने सांगितलेल्या दूरदर्शी सक्रियतेची परीक्षा पहाणारा हा काळ असल्याचा इशारा या विचारवंतांनी सर्वोच्च न्यायालयालाही दिला आहे.

दिल्ली- वाराणसीपासून आग्र्यापर्यंत ज्या विशिष्ट बातम्यांचा जो कल्लोळ सध्या सुरू झाला आहे त्याकडेच या विचारवंतांनी अंगुलिनिर्देश करून गंभीर चिंता व्यक्त केली हे दिसत आहे. या पत्रात गांधीवाद्यांनी म्हटले आहे की देशातून सध्या सातत्याने अशा बातम्या येत आहेत की भारतीय समाजातील एकता व सामाजिक ताणेबाणे उध्वस्त करण्यासाठीचे एकादे योजनाबध्द कारस्थान ‘व्यापक व सशक्त‘ पातळीवरून सुरू असल्याची शंका येते. जागोजागी सामाजिक समरसतेच्या पानांवर पेटती काडी टाकून धार्मिक विद्वेषाचा भयानक वणवा देशभर पेटावा असे हे कारस्थान आहे. हे कोण करत आहे याच्या चौकशांमध्ये न जाता आम्ही देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना असे आवाहन करू इच्छितो की अशांती पसरविण्यासारखा दुसरा अधर्म नाही. त्यामुळे देशवासीयांनी या कारस्थानाला बळी पडू नये. शांती हाच माणसाचा सर्वांत मोठा धर्म असून अशांतता परसविण्यासारखा अधर्म दुसरा नाही. त्यापेक्षा या असल्या गोष्टींत खुद्द सरकारने (राज्य-स्टेट) भूमिका घेणे हे अत्यंत गंभीर आहे.

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीबाबत ज्या पध्दतीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे व राज्य (स्टेट-सरकार) यात ज्या पध्दतीची भूमिका घेत आहे ती दुर्देवी असल्याचे आम्ही मानतो. सध्याच्या स्थितीत राज्यघटनेने दिलेल्या तटस्थतेच्या जबाबदारीचे पालन करून राजकीय व प्रशासकीय उपायांची व वर्तणुकीची आवश्यकता आहे. इतिहासात अशाच अशांतता व दुविधेत अडकून आम्ही एकदा फआळणीचे संकट झेलले आहे. जे इतिहासातून काही शिकत नाहीत ते इतिहासाची शिकार बनतात. जगात आज अशा धर्मांधतेच्या वावटळी येत आहेत त्यापासून अविचलीत रहून जगाला विनाशापासून वाचविण्याचा रस्ता भारतीय लोकच जगाला दाखवू शकतात. आपल्या प्रिय भारताला जोडणाऱया प्रत्येक आवाजात विविक जागृत असणाऱया प्रत्येक देशवासीयाने आपला आवाज मिसळण्याची, पावलाला पावलाची साथ देण्याची कधी नव्हे तकी गरज निर्माण झाली आहे. विवेकनिष्ठ भारतीयांपैकी एखाद्याचा आवाज जरी कमजोर पडला तरी देश कमजोर होईल. आम्हा सर्वांचा सामुदायीक विवेकच या नाजूक काळातून आम्हाला तारून नेऊ शकतो असेही या विचारवंतांनी म्हटले आहे.

या निवेदनावर गांधी स्मारक निधीचे प्रमुख रामचंद्र राही, दिल्लीच्या गांधी शांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार प्रशांत, गांधी राषअट्रीय संग्रहालयाचे प्रमुख अण्णामलाई, राष्ट्रीय युवा संघटनेचे अजमत खान, इतिहासकार रोमिला थापर, गांधी lशांती प्रतिष्ठान जमशेदपूरचे अरविंद अंजुम तसेच सुनीति सु र, आशीष नंदी, अशोक वाजपेयी, बजरंग सोनवणे, स्वराज इंडियाचे योगेन्द्र यादव आदी ९५ जणांच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com