दिव्या स्पंदनाकडून ट्विटर अकाउंट डिलीट; चर्चांना उधाण

वृत्तसंस्था
रविवार, 2 जून 2019

ट्विटरवर सध्या दिव्या स्पंदना यांचे अधिकृत ट्विटर अकाउंट दिसत नाही. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया बायोडेटामधून काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख हे सुद्धा हटविले होते. त्या सध्या काँग्रेससोबत आहेत की नाहीत हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस पक्षानेही अद्याप याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख आणि लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहिलेल्या दिव्या स्पंदना यांनी आपले ट्विटर अकाउंट डिलीट केल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

ट्विटरवर सध्या दिव्या स्पंदना यांचे अधिकृत ट्विटर अकाउंट दिसत नाही. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया बायोडेटामधून काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख हे सुद्धा हटविले होते. त्या सध्या काँग्रेससोबत आहेत की नाहीत हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस पक्षानेही अद्याप याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.

दिव्या स्पंदना यांनी अखेरचे ट्विट मोदी सरकारमधील नवीन मंत्रिमंडळातील खातेवाटपानंतर केले होते. निर्मला सितारामन यांची अर्थमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांचे ट्विटर अकाउंट डिलीट झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नुकतेच काँग्रेसच्या सर्व नेत्यांना एक महिनाभर कोणत्याही वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्यास सांगितले होते.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियात दुबळ्या असलेल्या काँग्रेसला सध्या सोशल मीडियात अग्रेसर बनविण्यात दिव्या स्पंदना यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी काँग्रेससोबत नसल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divya Spandana Controversy of deleted twitter account