'मैफिल' समूहाचा दिवाळी अंक दिल्लीत प्रकाशित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

'मैफिल' असे अभिमानाने सांगणाऱ्या मैफिल समूहाचा दुसरा दिवाळी अंक एका छोटेखानी कार्यक्रमात प्रसिद्ध झाला.

नवी दिल्ली : “एक आगळा-वेगळा प्रयोग जिथे व्हॉट्सअॅप समूहाच्या निमित्ताने वेगवेगळ्या जागी राहणारी मंडळी एकत्र आली आणि बघता-बघता सजली 'मैफिल' असे अभिमानाने सांगणाऱ्या मैफिल समूहाचा दुसरा दिवाळी अंक एका छोटेखानी कार्यक्रमात प्रसिद्ध झाला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या (IGNCA) ‘स्वस्ति कॅफेटेरियाच्या अंगणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते काल संध्याकाळी मैफिलच्या दिवाळी अंक २०१९ चे प्रकाशन झाले. स्टील मंत्रालयातील निवृत्त सचिव अरुणा लिमये आणि प्राप्तिकर खात्याच्या प्रिन्सिपल चिफ कमिश्नर व प्रसिध्द लेखिका साधना शंकर याही उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रक्षेपण फेसबुक लाइव्हद्वारे केल्यामुळे दिल्लीबाहेरच्या सदस्यांना त्याचा फायदा झाला. 

2018 मध्ये दिल्लीत साहित्य संमेलन घेण्याच्या ठरवू घातलेल्या पण आधीच फिस्कटलेल्या बेताचा उल्लेख करून, मुळे यांनी हा “failed attempt of Sahitya Sammelan” अशा सुंदर स्वरूपात बदलला आणि आज अशी ही साहित्य सेवा घडते आहे, याचे पाण्याचा प्रवास नदीकडून सागराकडे तसाच बाष्पीभवन, पाउस, हिमालयातला बर्फ आणि पुन्हा नदीच्या रूपकातून उत्तमप्रकारे मांडला.

“My feel is maifil,” असे प्रतिपादन करत दिल्लीत भविष्यात साहित्य संमेलन होईल याचा विश्वास दिला. तत्पूर्वी, एक दिवसाचे ‘विश्व मराठी संमेलन’ घेण्याची सूचना केली. त्यामध्ये फक्त साहित्य नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रातील विषयांवर पाच चर्चासत्रे घेण्याची संकल्पना मांडली. ज्यात केवळ महाराष्ट्र व दिल्लीतून नाही तर बृहन्महाराष्ट्र आणि परदेशातील प्रभुतींना निमंत्रित करुन वैश्विक संमेलन घेण्याची संकल्पना मांडली.

तसेच महाराष्ट्रातील इतर संस्थांना दिल्लीला कार्यक्रम प्रस्तुत करण्याची संधी ‘पुढचे पाऊल’ आणि ‘मैफिल’ परिवाराने देण्याचे सूचवले.

अपर्णा लिमये आणि साधना शंकर या दोघींनीही मैफिल समूहाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरवातीला दिवाळी अंक संपादिकाद्वयी क्षमा पाठक आणि आरती कुलकर्णी यांनी प्रस्तावानापर संवाद साधत मैफिल समूहाची जडण-घडण, गेल्या तीन वर्षातली वाटचाल आणि या वेळचा दिवाळी अंक व त्यातल्या साहित्याची ओळख करून दिली. 'पुढचे पाऊल' चे विलास बुर्डे  यांनीही मनोगत व्यक्त केले व वेळोवेळी मैफिलच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.

बृहन्महाराष्ट्रातील लेखक, कवी, कलाकारांचा बनलेला ‘मैफिल’ हा एक व्हाट्सअॅप ग्रुप आहे. यात दिल्ली-एनसीआर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश गुजरात गोवा इथली आणि काही मंडळी भारताबाहेरची देखील आहेत. Maifil.in नावानी या समूहाची वेबसाईट आहे ज्यात वेळोवेळी समुहात प्रस्तुत केलेल्या सदस्यांच्या लिखाणाला स्थान दिले जातं. दिवाळी अंक २०१८ नंतर समूहातर्फे वसंतोत्सव २०१९ हा अंकही सर्वांच्या सहभागाने उत्साहात प्रकाशित केला होता.

अधिक माहितीसाठी संपर्क : www.maifil.in


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Magazine of maifil have been published in Delhi