"दो बूंद जिंदगी के' आता आफ्रिकेत!

मंगेश सौंदाळकर : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

मुंबई - देशातील कोट्यवधी बालकांना पोलिओपासून वाचवणारी लस आता आफ्रिकेतील मुलांकरिता संजीवनी ठरणार आहे. हाफकिन जीव औषध महामंडळ द्विगुणी मौखिक पोलिओ लशीच्या आठ कोटी बाटल्यांचा पुरवठा नायजेरियाला करणार आहे. लवकरच हा लशींचा साठा विमानाने पाठवला जाईल. त्यामुळे हाफकिनचा आता झेंडा सातासमुद्रापार रोवला जाणार आहे.

मुंबई - देशातील कोट्यवधी बालकांना पोलिओपासून वाचवणारी लस आता आफ्रिकेतील मुलांकरिता संजीवनी ठरणार आहे. हाफकिन जीव औषध महामंडळ द्विगुणी मौखिक पोलिओ लशीच्या आठ कोटी बाटल्यांचा पुरवठा नायजेरियाला करणार आहे. लवकरच हा लशींचा साठा विमानाने पाठवला जाईल. त्यामुळे हाफकिनचा आता झेंडा सातासमुद्रापार रोवला जाणार आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांनी "दो बूंद जिंदगी के' अशी या लशीची जाहिरात केली होती. त्यामुळे खेडोपाडी नागरिक आपल्या बाळांना पोलिओची लस देऊ लागले. परिणामी, या आजाराचा रुग्ण न आढळल्याने दोन वर्षांपूर्वी "युनिसेफ'ने भारत पोलिओमुक्त झाल्याचे घोषित केले. या पोलिओमुक्तीत राज्य सरकारच्या "हाफकिन' संस्थेचा महत्त्वाचा वाटा होता. भारतात पोलिओचे निर्मूलन झाले असले तरी अन्य देशांत पोलिओचे रुग्ण आढळत आहेत. तेथील रुग्णांकुरता हाफकिनने पोलिओ लशीचे उत्पादन सुरू ठेवले आहे. पोलिओचे तीन प्रकारचे व्हायरस असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांनुसार "बीओपीव्ही' म्हणजे द्विगुणी मौखिक पोलिओ लस अन्य देशांत दिली जाते. टीओपीव्ही ही त्रिगुणी मौखिक लस कमी जोखीम असलेल्या देशांत वापरली जाते. विशेषतः नायजेरियात अशा केसेस आढळून येतात. त्यामुळे "युनिसेफ'ने हाफकिनकडे द्विगुणी मौखिक लशी बनवण्याबाबत विचारणा केली. या लशी या लवकरच विशेष विमानाने आफ्रिकेला रवाना केल्या जातील. पुढील महिन्यात नायजेरियात पोलिओ सप्ताह आहे. तेव्हा या लशी तेथील मुलांना पाजल्या जातील.

पाकिस्तानात इंजेक्‍टेबल लशीला मागणी
मौखिक पोलिओ लशीनंतर आता टोचता येणाऱ्या (इंजेक्‍टेबल) पोलिओ लशीला मोठी मागणी आहे. ही लस इंजेक्‍शनद्वारे दिली जाते. या लशीला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि केनियातून मोठी मागणी आहे. पाकिस्तानात 8 कोटी 5 लाख; तर अफगाणिस्तान आणि बांगलादेशात लशींच्या पाच कोटी बाटल्यांची मागणी आहे.

नायजेरियाला हाफकिनकडून द्विगुणी मौखिक लशीचा पुरवठा होणार आहे. "युनिसेफ'ने आमच्याशी पत्रव्यवहार केला होता. डिसेंबरअखेर हा पुरवठा पूर्ण केला जाईल.
- सुभाष शंकरवार, महाव्यवस्थापक (उत्पादन), हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ

Web Title: Do boond jindagiki now in Africa