"ओआरओपी'चे राजकारण नकोच - भाजप

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

"ओआरओपीस संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने वर्षानुवर्षे वाटाण्याच्या अक्षता लावल्या. आणि आता राष्ट्रीय लोकशाहीच्या आघाडीने ओआरओपी दिल्यानंतर राहुल गांधी यांनी या मुद्याचेही राजकारण करावयास सुरुवात केली आहे''

नवी दिल्ली - "ओआरओपी'च्या वाटपावर समाधानी नसलेल्या रामकिशन ग्रेवाल यांनी केलेल्या आत्महत्येचे निव्वळ राजकारण केले जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) आज (गुरुवार) करण्यात आला. याचबरोबर, ग्रेवाल यांची मानसिक स्थिती व त्यांनी केलेल्या आत्महत्येमागील कारणांची चौकशी व्हावी, असे मत भारताचे माजी लष्करप्रमुख व परराष्ट्र मंत्री (राज्य) व्ही के सिंह यांनी व्यक्त केले आहे. सिंह यांच्याबरोबरच भाजपचे उप राष्ट्रीय अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनीही यावेळी कॉंग्रेसवर हल्ला चढविला. ग्रेवाल यांच्या कुटूंबीयांची कॉंग्रेस नेत्यांनी भेट घेणे हा शुद्ध दुटप्पीपणा असल्याची कठोर टीका सहस्त्रबुद्धे यांनी केली.

"ओआरओपीस संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने वर्षानुवर्षे वाटाण्याच्या अक्षता लावल्या. आणि आता राष्ट्रीय लोकशाहीच्या आघाडीने ओआरओपी दिल्यानंतर राहुल गांधी यांनी या मुद्याचेही राजकारण करावयास सुरुवात केली आहे,'' असे सहस्त्रबुद्धे म्हणाले.

‘वन रॅंक वन पेन्शन’च्या (ओआरओपी) मुद्यावरून रामकिशन ग्रेवाल या माजी सैनिकाने केलेल्या आत्महत्येचे राजधानीत जोरदार राजकीय पडसाद उमटले. या माजी सैनिकाच्या कुटुंबाला एका रुग्णालयात भेटण्यापासून रोखल्याने; तसेच पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल; तसेच अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढविला.  

राहुल गांधी यांना पोलिसांनी वेळा ताब्यात घेऊन सोडून दिले. त्याच वेळी केजरीवाल यांच्या हालचाली रोखताना त्यांनाही काही काळासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सुमारे दहा तासांसाठी ताब्यात ठेवण्यात आले होते. ग्रेवाल यांच्या कुटुंबाला भेटण्याचा प्रयत्न करत असताना या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. ग्रेवाल यांनी ओआरओपीची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून विष प्राशन केले होते.

Web Title: do not politicize suicide, says bjp