अद्याप डोकलाममध्येच, मात्र सुरक्षित अंतरावर

यूएनआय
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पाकिस्तान आणि चीन सीमेवर गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांना अत्याधुनिक उपकरणे आणि शस्त्रे पुरविण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या आव्हानाचा सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत. काश्‍मीर हा भारताचाच भाग असून, या राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी लष्करावर आहे. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यास लष्कर कटिबद्ध असून, दहशतवादीही मोठ्या प्रमाणात मारले जात आहेत

बेळगाव - "वादग्रस्त डोकलाम भागातून भारत आणि चीनने आपापले लष्कर पूर्णपणे मागे घेण्यास अद्याप वेळ आहे. दोन्ही देशांचे सैन्य अद्यापही डोकलाममध्येच आहे; मात्र दोघांमध्ये सुरक्षित अंतर आहे,' असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज सांगितले.

मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंट सेंटर येथे मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या दोन बटालियनला प्रेसिडेन्टस्‌ कलर्स प्रदान केल्यानंतर जनरल रावत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दोन्ही देशांचे सैन्य अद्यापही डोकलाममध्ये असले, तरी परिस्थिती शांततापूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रावत यांना काश्‍मीर आणि दहशतवाद या संदर्भातही प्रश्‍न विचारण्यात आले. "पाकिस्तान आणि चीन सीमेवर गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांना अत्याधुनिक उपकरणे आणि शस्त्रे पुरविण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या आव्हानाचा सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत. काश्‍मीर हा भारताचाच भाग असून, या राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी लष्करावर आहे. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यास लष्कर कटिबद्ध असून, दहशतवादीही मोठ्या प्रमाणात मारले जात आहेत,' असे जनरल रावत यांनी सांगितले. काश्‍मीरमधील जनतेबरोबर जवानांची वर्तणूक सौहार्दपूर्णच असून काही अपवादात्मक घटनांमध्ये जवानांकडून अपराध झाल्यावर त्याची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

काश्‍मीरमधील अशांतता वाढण्यास सोशल मीडियाचाही हातभार लागला असला, तरी त्यावर नियंत्रण ठेवणे अद्याप शक्‍य झाले नसल्याचे ते म्हणाले.

"काश्‍मीरमधील युवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणी मिळत आहे. स्थानिक दहशतवाद्यांनाही पाकिस्तानमधून सर्वप्रकारे पाठबळ मिळत आहे. मात्र, या सर्व घटनांचा माग काढला जात असून, गुन्हेगारांना शासन होईल,' असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

Web Title: doklam general bipin rawat