काँग्रेसमुळेच डोनल्ड ट्रम्प यांच्या शाहीभोजनाचे सोनिया गांधींना निमंत्रण नाही!

टीम ई-सकाळ
Monday, 24 February 2020

डोनल्ड ट्रम्प यांच्या शाही भोजनासाठी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना राष्ट्रपती भवनातून निमंत्रण पाठवण्यात आलं होतं.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्यासाठी मंगळवारी रात्री राष्ट्रपती भवनात शाही भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भोजन समारंभाला 100हून अधिक पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलंय. यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना निमंत्रित करण्यात न आल्यानं त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

डॉ. मनमोहन सिंगांनी नाकारलं आमंत्रण
डोनल्ड ट्रम्प यांच्या शाही भोजनासाठी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना राष्ट्रपती भवनातून निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. त्यात काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. पण, चौधरी यांनी यापूर्वीच शाही भोजनाला जाण्यास नकार दिला आहे. तसेच आझाद यांनीही नकार दिला आहे. देशातील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना आमंत्रण न दिल्यामुळं दोन्ही नेते शाही भोजनाला उपस्थित राहणार नाहीत. दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीदेखील शाही भोजनाला आपण उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळं काँग्रेसचा एकही नेता या शाहीभोजनाला उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जातंय.

आणखी वाचा - दिल्लीत सीएएचा वणवा कायम; हिंसाचारात पोलिस ठार

आणखी वाचा - ट्रम्प म्हणतात, दहा वर्षांत भारतातली गरिबी कमी होणार

काँग्रेसच्या काळात काय घडलं? 
डोनल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या शाही भोजनाला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना निमंत्रण का देण्यात आलं नाही, यावरून उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. त्यात या प्रकाराची पेरणी काँग्रेसनेच केल्याचं बोललं जात आहे. मुळात विरोधी पक्षाच्या प्रतिनिधीला अशा शाही भोजनाला आमंत्रित करण्याची कोणतिही परंपरा नाही. त्यामुळंच संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात अमेरिकेचे दोन अध्यक्ष भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी सत्ताधारी काँग्रेसने तात्कालीन भाजपच्या विरोधीपक्ष नेत्यांना शाही भोजनाला आमंत्रित केले नव्हते. काँग्रेसनं सुरू केलेली हिच परंपरा भाजपनं पुढं सुरू ठेवल्याचं बोललं जातंय. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump banquet dinner invitation congress president sonia gandhi reason information marathi