esakal | एवढं करुनही ट्रम्प म्हणतात, 'भारताकडून चांगली वागणूक नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

Donald Trump says no big trade deal with India now
  • ट्रम्प यांची खंत
  • मोदींच्या नेतृत्वाचे मात्र कौतुक

एवढं करुनही ट्रम्प म्हणतात, 'भारताकडून चांगली वागणूक नाही'

sakal_logo
By
वृत्तसेवा

न्यूयॉर्क : प्रस्तावित भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारताने आम्हाला फारशी चांगली वागणूक दिलेली नाही, अशी खंत व्यक्त करतानाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मात्र कौतुक केले. अमेरिकेतील अँड्र्यूज येथील हवाईतळावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त मत मांडले. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला २४ पासून प्रारंभ होतो आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आम्हाला आताही भारतासोबत मोठे करार करता आले असते; पण मी हे सगळे निर्णय भविष्यासाठी राखून ठेवत आहे, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. विमानतळ ते प्रत्यक्ष कार्यक्रमाची जागा या दोन्ही दरम्यान सत्तर लाख लोक असतील, असे मोदींनीच मला सांगितले आहे. जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियमबद्दलदेखील लोकांच्या मनात कुतूहल आहे. हे खरोखरच खूप उत्साहवर्धक असून मी आशा करतो, की तुम्हीही याचा नक्की आनंद घ्याल, असा विश्‍वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

भारताला वगळले
मागील वर्षी ट्रम्प यांनी खास विकसनशील देशांसाठी आखण्यात आलेल्या कार्यक्रमातून भारताला वगळण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भारताचा समावेश झाला असता तर भारतीय मालासही अमेरिकेत आयात शुल्क लागले नसते. आता यानंतर दोन्ही देशांचे अधिकारी हे या अनुषंगाने वेगळा करार करण्याच्या तयारीत आहेत. हा करार प्रत्यक्षात आला तर भारतीय कृषी उत्पादनांसाठी अमेरिकी बाजारपेठेची दारे खुली होतील.

यमुनेत पाणी सोडले
नवी दिल्ली : ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने यमुना नदीमध्ये नव्याने पाणी सोडले आहे. नदीतील प्रदूषण कमी व्हावे आणि कचरादेखील वाहून जावा म्हणून पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याचे उत्तर प्रदेश सिंचन विभागाकडून जाहीर करण्यात आले. गंगानहार प्रकल्पातून पाण्याचा हा विसर्ग करण्यात आला आहे.

मोदी- ट्रम्प यांच्यात चर्चा
संरक्षण आणि व्यापारी क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा होणार असल्याचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी सांगितले. ट्रम्प यांचे २४ रोजी भारतात आगमन होईल, त्यांच्यासोबत उच्चस्तरीय शिष्टमंडळदेखील असेल, असे श्रींगला यांनी स्पष्ट केले.