'यूपी'मध्ये गाढव हा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पक्ष सदस्यांनी आपल्या उमेदवाराचे स्वागत करून पक्षाचे चिन्ह चप्पल दाखवली. 'गाढव हा योग्य उमेदवार आहे. कारण कसल्याही शिक्षणाशिवाय मंत्री बनता येते,' असे पक्षाध्यक्ष केशव चंद्र यांनी सांगितले. 

लखनौ- बड्या पक्षांना अद्याप आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणे शक्य झाले नाही, मात्र बहुजन विजय पक्षाने यामध्ये सर्वांत अगोदर बाजी मारली. पक्षाचे अध्यक्ष आणि समर्थक आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला फुलांचे हार गळ्यात घालून विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला निघाले होते. पण, हा उमेदवार माणूस नव्हता.. तर गर्दभसिंह यादव नावाचा एक गाढव होता!

शासकीय यंत्रणा आणि निवडणूक आयोग यांचा निषेध करण्याच्या उद्देशाने बहुजन विकास पक्षाने गाढवाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणले होते. मात्र, त्याला प्रवेश नाकारण्यात आला. येत्या निवडणुकीत आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणजे हे गाढव असल्याचे या पक्षाने जाहीर केले आहे. 

गर्दभसिंह याचा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी समर्थकांसोबत सोमवारी सकाळी पक्षाने रस्त्याने रॅलीदेखील काढली. रस्त्यात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी गर्दभसिंहला टाळया आणि शिट्ट्या वाजवून या अनोख्या निदर्शनाला दाद दिली.

पक्ष सदस्यांनी आपल्या उमेदवाराचे स्वागत करून पक्षाचे चिन्ह चप्पल दाखवली. 'गाढव हा योग्य उमेदवार आहे. कारण कसल्याही शिक्षणाशिवाय मंत्री बनता येते,' असे पक्षाध्यक्ष केशव चंद्र यांनी सांगितले. उत्तर प्रदेशच्या इतिहासात यादवांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने गर्दभसिंह यादव हे गाढवाला दिलेले नाव निवडले आहे, असे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Donkey as CM candidate in UP assembly polls