गुजरातच्या गाढवांना अखिलेश घाबरतात : मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

ते म्हणाले, "यादव यांची अशा प्रकारची टीका त्यांची जातीयवादी मानसिकता दाखवितो. अशा प्रकारच्या दुःस्वास त्यांना शोभत नाही."

बहारिच : मुख्यमंत्री अखिलेश यादव गुजरातच्या गाढवांना घाबरतात हे पाहून मला आश्‍चर्य वाटते. मात्र त्यांनी या एकनिष्ठ व कष्ट करणाऱ्या प्राण्यापासून प्रेरणा घ्यायला हवी, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टीका केली.

रायबरेलीतील सभेत यादव यांनी गाढवाची उपमा दिली होती. त्याला येथील प्रचारसभेत मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "यादव यांची अशा प्रकारची टीका त्यांची जातीयवादी मानसिकता दाखवितो. अशा प्रकारच्या दुःस्वास त्यांना शोभत नाही. निवडणुकीत विरोधक एकमेकांवर टीका करतातच. अखिलेश यांनी मोदी व भाजपवर टीका केली असती तर मी समजू शकलो असतो. मात्र, त्यांनी गाढवावर टीका केली याचे मला आश्‍चर्य वाटते. तुम्ही गाढवांना घाबरता का तेही हजारो किलोमीटर लांबच्या?''

ते म्हणाले, "देशातील जनता माझ्यासाठी मालक आहे. मी गाढवांकडून प्रेरणा घेतो, कारण मी लोकांसाठी दिवस-रात्र काम करतो. गाढवे त्याच्या मालकाशी कटिबद्ध असतात. तुमच्या जातीयवादी मानसिकतेचा मला धक्का बसतो. प्राण्यांच्या बाबतीतही ती डोकावते. तुम्ही गाढवांना वाईट समजता. एका म्हशीच्या शोधासाठी तुम्ही सारे सरकार कामाला लावले होते. त्यामुळे हे नैसर्गिक आहे. तुमची ती ओळखच आहे; पण जर मन स्वच्छ असेल तर गाढवेही प्रेरणा देतात. आम्ही ती घेतो. कारण गाढवे मालकाची सारी कामे करतात आणि हा प्राणी किफायतशीरही आहे.''

मोदी म्हणाले, "तुम्ही गुजरातच्या गाढवांचा द्वेष करीत असाल; पण या गुजरातच्या भूमीतच दयानंद सरस्वती, महात्मा गांधींचा जन्म झाला. भगवान कृष्णही या भूमीत राहिले. तुमचा मित्रपक्ष कॉंग्रेसने गुजरातच्या गाढवांवर टपाल तिकीटही काढले आहे.''
रायबरेलीतील नुकत्याच झालेल्या सभेत बोलताना अखिलेश म्हणाले होते की, टीव्ही वर एक जाहिरात येते, त्यात एक गाढव येते. आम्ही या शतकातील महानायकाला सांगू की, गुजरातच्या गाढवाचा प्रचार बंद करावा.'' अमिताभ बच्चन यांची ही गुजरात पर्यटनाची जाहिरात आहे. त्यावरील अखिलेश यांच्या या वक्तव्यावरून गेल्या काही दिवसांत प्रचारात राळ उडाली आहे.

Web Title: donkeys of gujarat scare akhilesh yadav, says pm modi