टीका करण्यापेक्षा ट्रम्प यांचा अभ्यास करा: जयशंकर

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

ट्रम्प यांच्या धोरणांचे परीक्षण करणे आवश्‍यक आहे. ट्रम्प हे एका विचार व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे धोरण हे निव्वळ तात्कालिक प्रतिक्रिया नाही

मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर सतत टीका करण्यापेक्षा त्यांचे धोरण अभ्यासणे आवश्‍यक असल्याचे मत भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी व्यक्त केले आहे.

""ट्रम्प यांना विखारी टीकेचे लक्ष्य करु नका. त्याऐवजी ट्रम्प यांच्या धोरणांचे परीक्षण करणे आवश्‍यक आहे. ट्रम्प हे एका विचार व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे धोरण हे निव्वळ तात्कालिक प्रतिक्रिया नाही,'' असे जयशंकर म्हणाले. ट्रम्प यांच्यासहित जयशंकर यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनामधून संवेदनशील असलेल्या इतर मुद्यांसंदर्भातील भूमिकाही स्पष्ट केली.

""पाकिस्तानमधील दहशतवादाचा कारखाना बंद व्हावयास हवा. याआधी दहशतवाद ही भारताची समस्या असल्याचे मानले जात होते. मात्र आता दहशतवाद ही मोठी समस्या आहे. दहशतवादासंदर्भात आता जागतिक पातळीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे,'' असे जयशंकर म्हणाले.

जयशंकर हे ""राजकीय बदल आणि आर्थिक अनिश्‍चितता' या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन परराष्ट्र मंत्रालय आणि मुंबईतील एका थिंक टॅंकद्वारे संयुक्तरित्या करण्यात आले होते.

Web Title: Don't demonise Trump, analyse him: S Jaishankar