दोवाल यांची धर्मगुरूंशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ
अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी ऐतिहासिक निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाचही न्यायाधीशांच्या सुरक्षेत आज वाढ करण्यात आली आहे. या न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त तुकड्या आणि शीघ्र सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नझीर या सर्व न्यायाधीशांना अतिरिक्त संरक्षण देण्यात आले आहे.

नवी दिल्ली - अयोध्येतील निकालाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजघटकांमधील बड्या धार्मिक गुरूंची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. या निकालानंतर देशभरात शांतता आणि सौहार्द कशा पद्धतीने कायम ठेवता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली.

तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी अयोध्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल देताना ‘त्या’ वादग्रस्त जागी ट्रस्टच्या माध्यमातून राम मंदिराच्या उभारणीचे आदेश देतानाच मशिदीच्या उभारणीसाठीदेखील पाच एकरची पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असे म्हटले होते. 

आजच्या बैठकीस बाबा रामदेव, स्वामी परमात्मानंद, स्वामी चिदानंद सरस्वती, अवधेशानंद गिरी, शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जावेद आणि अन्य मंडळी उपस्थित होती. देशातील शांतता आणि सुव्यवस्था कशी कायम ठेवता येईल, हाच विषय या चर्चेच्या केंद्रस्थानी होता. या सर्वच धार्मिक मंडळींचे देशभरात शिष्यगण असून, त्या सर्वांनीच त्यांच्या अनुयायांना बंधूभाव, शांतता राखण्याचे आवाहन करावे, असेही या बैठकीत ठरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doval talks with religious leaders