गु्ंतवणूक करताय? सुरक्षित पीपीएफचाही विचार करू शकता!

डॉ. दिलीप सातभाई  (चार्टर्ड अकाउंटंट)
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

नव्या बदलांनंतर ‘पीपीएफ’ योजना अधिक सुरक्षित झाली आहे. ही बाब सर्व खातेदारांना उत्साहवर्धक दिलासा व समाधान देणारी असल्याने नक्कीच स्वागतार्ह आहे.

केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) या योजनेचे सर्व जुने नियम रद्द करून नवे पीपीएफ नियम २०१९ नुकतेच जाहीर केले आहेत. या नियमात पूर्वी या योजनेला असणारी सुरक्षेची विशेष तरतूद कवच कुंडलासह पुन्हा बहाल केली आहेत. नव्या बदलांनंतर ‘पीपीएफ’ योजना अधिक सुरक्षित झाली आहे. ही बाब सर्व खातेदारांना उत्साहवर्धक दिलासा व समाधान देणारी असल्याने नक्कीच स्वागतार्ह आहे.

Image result for investment

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) ही योजना करसवलत व बचत करण्याचे मध्यमवर्गीयांचे साधन असणारी लोकप्रिय योजना आहे. वित्त कायदा २०१८ मध्ये एक महत्त्वपूर्ण बदल सुचविण्यात येऊन पीपीएफ कायदा, १९६८ रद्द करण्यात आला होता. तथापि, या कायद्यात नमूद केलेली ही योजना रद्द न होता, गव्हर्नमेंट सेव्हिंग्ज बॅंक्‍स ॲक्‍ट १८७३ मध्ये तिचे विलीनीकरण करून इतर अल्पबचत योजनांबरोबर सामील करण्यात आली होती. हा बदल विधी आयोगाच्या शिफारशींच्या आधारावर केला गेला होता. तथापि, हा बदल करताना खात्यातील शिल्लक रकमेवर कोणत्याही आदेशानुसार किंवा न्यायालयाच्या ‘डिक्री’अंतर्गत धनको जप्ती वा टाच आणू शकत नव्हते. ही विशेष तरतूद गव्हर्नमेंट सेव्हिंग्ज बॅंक्‍स ॲक्‍ट १८७३ मध्ये नसल्याने पीपीएफ कायद्यात यासंदर्भात असणारी सुरक्षिततेची कवचकुंडले अनुपलब्ध झाली होती. या निर्णयावर मध्यमवर्गीयांनी मोठ्या संख्येने नाराजी व्यक्त केली होती. त्याचा योग्य परिणाम होऊन केंद्र सरकारने या योजनेचे सर्व जुने नियम रद्द करून नवे पीपीएफ नियम २०१९ नुकतेच जाहीर केले आहेत. या नियमात पूर्वी या योजनेला असणारी वरील सुरक्षेची विशेष तरतूद कवचकुंडलासह पुन्हा बहाल केली आहेत. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच या खात्यातील शिल्लक कोणत्याही आदेशानुसार किंवा न्यायालयाच्या ‘डिक्री’अंतर्गत जप्तीच्या अधीन असणार नाही, अशी स्पष्टता आलेली आहे. ही बाब सर्व खातेदारांना उत्साहवर्धक दिलासा व समाधान देणारी असल्याने नक्कीच स्वागतार्ह आहे.

Image result for investment

काय आहेत तरतुदी?
नव्या नियमांनुसार, ‘पीपीएफ’चे खाते उघडताना किमान रु. ५०० भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. एखाद्या आर्थिक वर्षी अशी रक्कम जमा करणे शक्‍य झाले नसेल, तर पुढील वर्षात ही न भरलेली रक्कम ५० रुपयांच्या दंडासह भरावी लागणार आहे. हे खाते किमान पंधरा वर्षांसाठी असल्याने मुदतीपूर्वी बंद करता येत नव्हते. आता त्यात थोडा बदल झाला असून, जीवाला धोका असणारे खातेदाराच्या सहचऱ्याचे, मुलांचे, पालकांचे आजारपण किंवा खातेदाराचे वा खातेदारांवर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी भराव्या लागणाऱ्या शैक्षणिक शुल्काच्या कारणासाठी; तसेच परदेशात मान्यताप्राप्त उच्च शिक्षणसंस्थेत प्रवेशाच्या निश्‍चितीच्या खर्चाची तजवीज करण्यासाठी किंवा निवासी व्यक्ती अनिवासी झाल्यास पाच वर्षांनंतर खाते बंद करून संपूर्ण रक्कम परत घेता येऊ शकेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. 

Image result for investment

खातेदारांची अडचण दूर
अशा कठीण समयी यातील गुंतवणूक बॅंकेकडे तारण ठेवून कर्जाद्वारे पैसे उभारून आर्थिक विवंचना दूर करता येत होती. यात गुंतवणूकदाराला स्वतःच्याच पैशासाठी गरजेच्यावेळी अधिक व्याज देऊन पैसे उभे करावे लागत होते. ती अडचण आता दूर होऊ शकणार आहे. तथापि, असे करताना खातेदाराला मिळालेल्या व्याजाच्या एक टक्का व्याज परत करावे लागणार आहे, ही नवी तरतूदपण समाविष्ट करण्यात आली आहे. सरकारला ठराविक कालावधीसाठी मिळणारे पैसे ज्या उत्पादक कारणासाठी बिनधास्त वापरता येत होते, ते आता थोड्या कमी प्रमाणात वापरता येतील. व्याजदर कमी झाले तर अल्पबचत योजनेतील पैसे काढून घेण्याची वृत्ती वाढेल. इतरांना पूर्वीप्रमाणेच पाच वर्षांच्या अखेरीस असलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम काढता येईल, असे स्पष्ट केले आहे. खाते मुदतपूर्व वा मुदतपूर्तीनंतर बंद झाल्यास नवे खाते उघडण्याचा पर्याय आता उपलब्ध करण्यात आला आहे. खात्यातील रकमेवर योजनेच्या अटीनुसार कर्ज घेण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे. हिंदू अविभक्त कुटुंबपद्धतीस (एचयूएफ) हे खाते उघडण्याची अनुमती देण्यात आलेली नाही.   

अज्ञान वा मानसिक अपंग अपत्याच्या नावाने खाते उघडण्याची मुभा
नवे खाते आता अज्ञान वा मानसिक अपंग असलेल्या अपत्याच्या नावाने उघडण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तथापि, पालक व एक किंवा अधिक अपत्यांच्या नावाने भरण्यात येणारी सर्व एकत्रित रक्कम दीड लाख रुपयापेक्षा अधिक असू शकणार नाही, अशी पूर्वअट घालण्यात आली आहे. त्यामुळे एका व्यक्तीस दीड लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. अपत्याचा ‘पॅन’ व खातेदाराचा ‘पॅन’ वेगळा असल्यास विविध बॅंकांत अशी खाती उघडल्यास याचे नियंत्रण कसे होणार हे अजूनतरी गुलदस्तातच आहे. नवे खाते आता संयुक्तरीत्या उघडता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अज्ञान व्यक्तीस विशेष अधिकार देण्याची तरतूद असल्याने आता अज्ञान व्यक्तीदेखील गुंतवणुकीचा उत्तराधिकारी ठरवू शकणार आहे, ही नवीन बाब आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Dilip Satbhai writes article PPF is more secure

टॅग्स